तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये रविवार व सोमवार दोन दिवशी तौक्ते चक्रीवादळामुळे वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे आदिवासी भागातील अनेक घरांची छत उडाली, तर काही घरांच्या भिंती कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फलोदे ह्या गावच्या मुदगुणवाडी येथील भीमा धोंडू मेमाणे ह्या आदिवासी बांधवाच्या घराच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे सलग दोन दिवस मुसळधार पडलेल्या अवकाळी पावसामुळे या भागामध्ये आदिवासी बांधवांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून समजल्या जाणार्या हिरड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडणीसाठी आलेल्या हिरड्यांचा खच हिरड्याच्या झाडाखाली पडला आहे. तर बाळहिरडा करण्यासाठी वाळत घालण्यात आलेला हिरडा अक्षश: भिजून गेला आहे. तर मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी वार्यामुळे गेले दोन-तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आदिवासी भाग अंधारामध्ये आहे. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांनी पुढील काळासाठी झाडावर जमिनीवर रचून ठेवलेले गवत भाताचा पेंढा भिजून गेला आहे. यामुळे चार्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण, म्हाळुंगे, पिंपरी, फलोदे, तळेघर ह्या गावांना समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी भेटी देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली.
या वेळी तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी, सहाय्यक गटविकास अधिकारी जे. के लहामटे, कनिष्ठ सहाय्यक समाजकल्याण विभाग शंकर भालेराव, तलाठी अनुप कवाणे, संकेत गवारे व आदिवासी भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १८तळेघर आदिवासी नुकसान
फोटो ओळी : : आदिवासी भागात वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार व तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी.
तळेघर