पुरंदर तालुक्यातील १७ सदस्यसंख्या असलेल्या नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तेजश्री विराज काकडे यांची, तर उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश अशोकराव काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीची घोषणा अध्यासी अधिकारी मिलिंद मोरे यांनी केली.
पुरंंदर तालुुुक्यातील नीरा ग्रामपंचायतीच्या सतरा जागांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली. या निवडणुकीत राजेश काकडे व विराज काकडे यांच्या नीरा विकास आघाडीला दहा जागा, दत्ताजीराव चव्हाण व अनिल चव्हाण यांच्या चव्हाण पॅनेलला चार, तर चंदरराव धायगुडे यांच्या भैरवनाथ विकास आघाडीला तीन जागा मिळाल्या. त्या पार्श्वभूमीवर नीरा ग्रामपंचायतीत मंगळवारी दि. ९ रोजी अध्यासी अधिकारी तथा पुरंदरचे सहा. गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली. जि.प.चे माजी सदस्य विराज काकडे यांच्या पत्नी तेजश्री विराज काकडे यांचा सरपंचपदासाठी, तर राजेश अशोकराव काकडे यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी मिलिंद मोरे यांनी जाहीर केले. ग्रामसेवक मनोज डेरे यांनी सहायक म्हणून कामकाज पाहिले.
ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे पुरंदर पं. स. चे उपसभापती प्रा. डॉ. गोरखनाथ माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भय्यासाहेब खाटपे, रमणिकलाल कोठडिया, सोमेश्वरचे संचालक लक्ष्मण गोफणे, नाना जोशी, चंदरराव धायगुडे, धनंजय काकडे, चंद्रशेखर काकडे, यांच्यासह बहुसंख्य नागरिकांनी अभिनंदन केले.