पुणे : येत्या महिला दिनी पुणे व पिंपरी चिंचवडमधील महिला प्रवाशांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) खास भेट दिली जाणार आहे. शहरांतील आठ मार्गांवर नवीन ३० बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, या बसचे ‘तेजस्विनी बस’ असे नामकरण केले जाणार आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या ‘पीएमपी’च्या बसने सध्या दहा लाखांहून अधिक नागरिक प्रवास करतात. या प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. ही बाब लक्षात घेऊन काही वर्षांपासून ठराविक मार्गांवर गर्दीच्या वेळी महिलांसाठी विशेष बस सुरू करण्यात आल्या.मात्र, या बसला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सध्या केवळ ४ ते ५ मार्गांवरच विशेष बस सुरू आहेत. या बसही केवळ सकाळी व सायंकाळी अशा गर्दीच्या वेळी सोडल्या जातात. इतर बसमध्ये महिलांसाठी डाव्या बाजूकडील जागा राखीव असल्या तरी अनेकदा पुरुष प्रवासी तिथे बसलेले असतात. त्यावरून वादही होतात.गर्दीमध्ये बसमध्ये चढणे शक्य होत नाही. पर्स, दागिने चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. काहीवेळा विनयभंगालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक अडचणींवर मात करून महिलांना प्रवास करावा लागतो.‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी पहिल्याच दिवशी महिलांसाठी चांगली सेवा देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार येत्या महिला दिनापासून महिलांसाठी नवीन ३० बस सुरू करण्याचे नियोजन करण्यातआले आहे.‘पीएमपी’ ताफ्यात टप्प्याटप्याने २०० अत्याधुनिक मिडी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात येणाºया ३० बस महिला विशेष म्हणून सोडण्यात येणार आहेत. या बस शहरातील गर्दीच्या मार्गांवर गरजेनुसार नियमितपणे सोडण्यात येणार आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय सोमवारी होणार आहे.सध्या या मार्गांवर बसची चाचपणी सुरू आहे. बसमधील डिजिटल फलकामध्ये मार्गाचीमाहिती टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्याचीही चाचणी घेतली जात असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.बस येण्यास बराच कालावधीनवीन ३० बसचे नामकरण ‘तेजस्विनी बस’ असे केले जाणार आहे. राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या तेजस्विनी बस ताफ्यात येण्यास अद्याप बराच कालावधी लागणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सध्या मिडी बस तेजस्विनी बस म्हणून सोडल्या जाणार आहेत. राज्य शासनाच्या अटींनुसार या मिडी बसमध्येही बºयापैकी सुविधा आहेत. मात्र, शासनाच्या निकषानुसार संबंधित बस दाखल झाल्यानंतर सध्याच्या मिडी बस बदलून या बस मार्गावर सोडल्या जातील, असे अधिकाºयांनी सांगितले.नवीन मिडी बसची रचनाबसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी ३२ खुर्च्यांची व्यवस्था असून चालकाच्या मागील बाजूस सीटबेल्टची व्यवस्था आहे. बसमध्ये पुढे व मागील बाजूस प्रत्येकी एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मागील दरवाजाजवळ कचराकुंडी आहे. बसमध्ये डिजिटल फलक असून त्यावर प्रत्येक थांब्याची माहिती झळकणार आहे. मार्गावरील बसचे ठिकाण, बसची स्थिती याबाबतची सर्व माहिती ‘आयटीएमएस’ यंत्रणेद्वारे नियंत्रण कक्षात कळणार आहे.
महिला दिनापासून ‘तेजस्विनी’ बस रस्त्यावर, पीएमपीकडून भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 4:49 AM