माजी नगरसेविकेने वाद घातल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 09:00 PM2022-06-16T21:00:08+5:302022-06-16T22:58:26+5:30
माजी नगरसेविकेचा हडपसर क्षेत्रीय कार्यलयात उपअधीक्षकांशी वाद झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काम बंद आंदोलन केले.
हडपसर : माजी नगरसेविकेचा हडपसर क्षेत्रीय कार्यलयात उपअधीक्षकांशी वाद झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काम बंद आंदोलन केले. मात्र, माजी नगरसेविका पूजा कोद्रे आणि उपअधीक्षक प्रदीप भुजबळ यांनी हा प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे सांगत कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. सकाळी १० ते २ या काळात आंदोलन झाले होते.
माजी नगरसेविका पूजा कोद्रे या कार्यालयाकडील आस्थापना विभागात आल्या होत्या. उप अधीक्षक प्रदीप भुजबळ यांच्या टेबलजवळ येऊन त्यांनी कार्यालयाच्या तळमजल्यावरील बारनिशी विभागाचे प्रवेशद्वारावरील माझ्या नावाचा बोर्ड का काढला? असा जाब विचारला. सदर बोर्ड निखळला होता व धूळ, जाळ्याजळमटे साठल्यामुळे तो बोर्ड बारनिशी विभागामध्ये उभा करून ठेवला होता, असे भुजबळ यांनी सांगितले. त्यानुसार तो बोर्ड त्वरित स्वच्छ करून त्याचवेळी पूर्वी आहे तसा पूर्ववत लावण्यात आला. याबाबतचा फोटो त्यांच्या व्हॉटस अपवर पाठविला होता. यापुढे असे होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येईल असे कळविले होते, असेही भुजबळ यांनी सांगितले. मात्र, तरीही कोद्रे यांनी वाद घातला अशी तक्रार भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांकडे तसेच हडपसर पोलीसांत केली होती. मात्र, हा प्रकार गैरसमजुतीतून घडला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
कोद्रे याबाबत म्हणाल्या की, क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष असताना दिव्यांगांना दुसऱ्या मजल्यावर जावे लागू नये, तळमजल्यावर व्यवस्था व्हावी या सोईसाठी आपण खोली साफ करून घेऊन तेथे बारनिशी विभाग सुरू केला होता. त्यावेळी अध्यक्ष या नात्याने बोर्ड लावला होता. आता आचारसंहिता नसतानाही बोर्ड काढण्याचे कारण नाही, असे सांगितले. भुजबळ यांनीही ते मान्य केले आहे.