युगंधर ताजणे पुणे : त्यांच्या नोकरीचा ३० एप्रिल हा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसांपर्यत ‘ते’ कोरोनाच्या बंदोबस्तासाठी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत होते. खरंतर प्रदीर्घ काळ नोकरीत घालवल्यानंतर आपल्या निरोप समारंभाला अधिकारी, सहकारी मित्र आपल्याबद्दल कौतुकपर दोन शब्द बोलतील, छोटा मोठा कृतज्ञता पर समारंभ होईल, घरचे त्यात सहभागी होतील अशी सर्वांसारखी त्यांची अपेक्षा होती. पण कोरोनामुळे हा योग अखेर काही जुळून आला नाही आणि त्यांची ती इच्छा अधुरी राहिली. पण 'सगळं आपल्या मनासारखे कसे होईल, परिस्थितीच अशी आहे की काही करता येणार नाही'. हे वाक्य बोलताना ‘त्यांच्या’डोळ्यांच्या कडा जशा पाणावल्या होत्या तसे त्यांचे शब्दही थोडे भिजल्यासारखे वाटत होते. दिवंगत कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या 'पेला अर्धा सरला आहे, असं सुद्धा म्हणता येतं; पेला अर्धा भरला आहे, असं सुद्धा म्हणता येतं; फक्त सरला आहे म्हणायचं की भरला आहे हे तुम्हीच ठरवा' या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सेवा निवृत्ती नंतरच्या सहायक पोलीस फौजदाराच्या सुनील जगताप यांच्या बोलण्यातून आला...
जगताप म्हणाले, ७ एप्रिल १९८६ मध्ये पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सहभागी झालो. पहिली पोस्टिंग समर्थ पोलिस स्टेशन येथे झाली. त्यानंतर चतु:शृंगी, फरासखाना, हिंजवडी, वाकड आणि शेवटी पुन्हा स्वारगेट पोलीस स्टेशन असा आजवरच्या नोकरीचा प्रवास होता. अखेर निरोप समारंभ जवळ आला. त्यावेळी इतर व्यक्तीप्रमाणेच आपलाही चांगला कार्यक्रम पार पडेल अशी इच्छा होती. ३५ वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर शेवटी आपल्या कामाची पोचपावती म्हणून साहेब लोकांकडून दोन चार शब्द कौतुकाचे कुणाला ऐकायला आवडणार नाहीत ? मात्र तसे झाले नाही. या कौतुक सोहळ्याला आणि समारंभाला कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुरड घालावी लागली. शेवटचा दिवस देखील बंदोबस्तातच गेला. परंतु यात निराश होण्यासारखे काही नाही. संकट आल्यावर आपल्याला पहिल्यांदा ते दूर करणे जास्त महत्वाचे आहे. समजून घ्यायला हवे. शेवटी सगळ्या गोष्टींची अॅडजसमेंट महत्वाची आहे. असे जगताप सांगतात.