- भानुदास पऱ्हाड
शेलपिंपळगाव (पुणे) : सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय... शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का? असा प्रश्न भोलानाथला विचारला जातो. मात्र सांगा साहेब, एनएच ५४८ डी (तळेगाव - चाकण- शिक्रापूर) रस्ता कधी होणार? असा सवाल भोसे (ता. खेड) येथील शेतकऱ्यांनी चक्क बैलावर रेखाटून उपस्थित केला आहे. एकंदरीतच बहुप्रतीक्षेत मार्गाचे काम कधी होणार हे भोलानाथाला विचारण्याची वेळ आली आहे.
सद्यस्थितीत तळेगाव - चाकण - शिक्रापूर या मार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. मार्गावर ठिकठिकाणी एक ते दीड फुटाचे खोल खड्डे पडलेले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतरही मंजुऱ्यांच्या फेऱ्यात अडकलेल्या तळेगाव - चाकण - शिक्रापूर या महामार्गाबाबत केवळ घोषणांची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. या संदर्भात वर्षानुवर्षे चाललेला घोषणांचा भडिमार थांबून प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार याबाबत वाहतूकदार आणि परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये साशंकता आहे.
तळेगाव - चाकण - शिक्रापूर हा रस्ता पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडत आहे. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे होत असल्याने बहुतांशी वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहनांची मोठी गर्दी नित्याने पाहायला मिळत आहे. सध्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताच्या संख्येत कमालीची वाढ होऊ लागली आहे. वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. वास्तविक संपूर्ण महामार्गाचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. मात्र २०१७ पासून रस्त्याच्या कामासाठी अमुक कोटींची तरतूद, रस्त्याच्या कामासाठी तमुक कोटींची तरतूद एवढंच ऐकायला मिळत आहे. प्रत्यक्षात रस्त्याचे काम बहुप्रतिक्षेत राहिल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
सांगा साहेब, तळेगाव - चाकण - शिक्रापूर या महामार्गाचे काम कधी होणार ? असा प्रश्न भोसे येथे बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर दिगंबर चंद्रकांत लोणारी व सागर बाबासाहेब लोणारी यांनी बैलांच्या अंगावर रेखाटून उपस्थित केला आहे. या रस्त्याच्या कामासाठी दोन दिवसांपूर्वी परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी आढावा बैठक घेऊन रस्ता बंद करण्याचा इशारा दिला आहे.