पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) तर्फे ज्याेतिषांसाठी एक आगळी वेगळी ऑफर पुन्हा एकदा जाहीर केली आहे. सतराव्या लाेकसभा निवडणुकीचे भविष्य अचूक वर्तवणाऱ्याला लवकरच अंनिस 21 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करणार आहे. गेल्या लाेकसभेच्या निवडणुकीवेळी देखील असेच आव्हान अंनिस तर्फे देण्यात आले हाेते. परंतु तेव्हा काेणीही ज्याेतिष पुढे आले नव्हते. यंदा पुन्हा अंनिसतर्फे एका परिपत्रकाद्वारे ज्याेतिषांना आव्हान देण्यात आले आहे.
28 फेब्रुवारी 2014 राेजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंनिस तर्फे अचूक भविष्य वर्तवणाऱ्या ज्यातिषांसाठी 21 लाख रुपयांचे बक्षिस जिंकण्याची संधी महाराष्ट्र अंनिसने दिली हाेती. त्याच धर्तीवर सतराव्या लाेकसभा निवडणुकीचे भविष्य ज्याेतिषांनी वर्तवावे असे आव्हान महाराष्ट्र अंनिसतर्फे देण्यात येत आहे. असे राज्य कार्यध्यक्ष अविनाश पाटील यांनी जाहीर केले आहे. या आव्हान प्रक्रियेचे तपशिल आणि वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच प्रतिथयश ज्यातिष संस्था व व्यक्तिंना व्यक्तिशः पाठविले जाणार आहे असेही सांगण्यात आले आहे.
2014 मध्ये झालेल्या लाेकसभा निवडणुकांमध्ये सहभागी झालेल्या विविध पक्षांना मिळणाऱ्या जागा, निवडून येणाऱ्या उमेदवरांच्या मतांची टक्केवारी, महत्त्वाच्या मतदारसंघातील मंत्रिमंडळातील काही सदस्यांची नावे याविषयीचे भविष्य वर्तविले जावे असे आव्हान त्या प्रक्रियेत अपेक्षित हाेते. एकूण 30 प्रश्न विचारलेले हाेते, त्यापैकी 22 प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यास बक्षिस मिळणार हाेते. उत्तरामध्ये पाच टक्के फरक अपेक्षित धरलेला हाेता. परंतु तरीही काेणीही हे आव्हान स्विकारले नव्हते.
याविषयी बाेलताना अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख म्हणाले, अनेक ज्याेतिषी निवडणुकांचा निकाल सांगू असे भाकित करतात. यात अनेक उमेदवारांची फसवणुक देखील हाेत असते. त्यामुळे अंनिसतर्फे ज्याेतिषांना निवडणुकीचे भविष्य वर्तवण्याचे आव्हान देण्यात आले आहे. ज्यातिषांनी देशाचं नाहीतर एखाद्या उमेदवाराला किती मतं मिळतील हे तरी अचूक सांगून दाखवावे. निवडणुकीत असे फसवणुकीचे अनेक प्रकार घडत असतात, त्यामुळे उमेदवारांनी देखील अशा भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन अंनिसकडून करण्यत येत आहे. तसेच ज्याेतिषांनी भविष्य हे तर्काच्या आधारे नाहीतर उमेदवाराच्या कुंडलीच्या आधारे सांगून अंनिसचे आव्हान स्विकारावे.