पुणे : मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळ्यांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्याकरिता मैदानात उतरावे. तसेच आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्यासोबत असून तुमची वाट पाहत आहे अशा आशयाचे आणि मराठा आरक्षणाला नक्षलींचा पाठिंबा दर्शविणारे पत्रक सध्या समोर आले आहे. याच पत्रकावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परखड मत व्यक्त केले आहे.
पुण्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. वळसे पाटील म्हणाले, आपल्या लोकशाही राज्यात राज्य घटना, सरकार, न्यायालय यांच्यामार्फत सगळे प्रश्न सोडवले जात आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या आवाहनाचा फार विचार करण्याची गरज नाही. तसेच नक्षली चळवळ ही व्यवस्थेच्या विरोधातील आहे. व्यवस्थेच्या विरोधात जे लोकं काम करतात त्यांनी अन्य लोकांना तुम्ही आमच्यात या, संघर्ष करा असे सांगणे देशाच्या व्यवस्थेला आव्हान देण्यासारखेच आहे किंवा धोका निर्माण करण्यासारखं आहे असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मराठा आरक्षणा संदर्भातलं पत्रक काढले आहे. यात मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा त्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजातील तरुणांना नक्षली चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. या पत्रकात माओवादी राज्य समिती सचिव सह्याद्रीने मराठा आरक्षणाला नक्षलींचा पाठिंबा असल्याचे सांगितले आहे.
माओवादी नक्षलवाद्यांना जी बाब कळते ती मुर्दाड सरकारला कळेना : विनायक मेटे
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे म्हणाले, मराठा समाजावर आरक्षणासंबंधी झालेल्या अन्यायाची बाब माओवादी नक्षलवाद्यांना समजत आहे पण राज्यातील मुर्दाड महाविकास आघाडी सरकारला समजत नाहीये. नक्षलवाद्यांनी पत्रकाद्वारे मराठा आरक्षणाला समर्थन दिले आहे ही गोष्ट जास्त गंभीर आहे.पाठिंब्याच्या पाठीमागे नक्षलवादी आपले जाळे विस्तारत आहे.
नक्षलींच्या मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यावर खासदार संभाजीराजे काय म्हणाले होते...मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवितानाच या समाजातील तरुणांना नक्षली चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन कऱण्यात आले होते. त्याचाच संदर्भ घेत मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने,“नक्षलवाद्यांनो या, आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. मुख्य प्रवाहात, सामील व्हा असेही खासदार संभाजीराजे यांनी आवाहन केले होते.