पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या तापमानात सातत्याने वाढ हाेत असून साेमावारी पुण्याचे तापमान 36.2 अंशावर पाेहाेचले आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे दुपारच्यावेळी रस्त्यांवरची वाहतूक कमी झाली आहे. नागरिक उन्हापासून वाचण्यासाठी विविध साधनांचा उपयाेग करत आहेत.
यंदा पुण्यात कडाक्याची थंडी पडली हाेती. पारा 6 अंशापर्यंत घसरला हाेता. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शहरात थंडी जाणवत हाेती. गेल्या चार पाच दिवसांपासून तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. दुचाकीवरुन प्रवास करताना नागरिक हेल्मेटचा तसेच फुल बाह्यांच्या शर्ट वापरण्यावर भर देत आहेत. सरबतांच्या स्टाॅलवर देखील हळूहळू आता गर्दी वाढताना दिसत आहे. पुणेकर दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मालेगावच्या पारा सर्वाधिक 39.2 अंशावर गेला हाेता. त्याखालाेखाल अमरावती आणि साेलापूरचा पारा 38.4 अंशावर पाेहाेचला हाेता.
दरम्यान तापमानात अचानक झालेल्या बदलामुळे अनेकजण आजारी देखील पडले आहेत. ताप, सर्दी आणि घसा सुजण्याचे प्रकार वाढले आहेत.