लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एका बाजूला उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला असताना मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील कमाल व किमान तापमानात वाढ झाली. विदर्भात मात्र अजूनही थंडीचा कडाका जाणवत आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली परिसरात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेश, वायव्य परिसरातील हवामानात बदल झाल्याने येत्या दोन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतातील थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा थंड वार्याचा प्रवाह मध्य भारताकडे येणार असून मध्य प्रदेश व लगतच्या भागात पुढील दोन दिवसांनंतर किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर कोकण, गोव्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली आहे. पुढील चार दिवस राज्यातील किमान तापमान हे सरासरीच्या जवळपास राहणार असून नववर्षाच्या प्रारंभ कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आल्हाददायक वातावरण असण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १२.७, लोहगाव १४.८, जळगाव १२.७, कोल्हापूर १७.६, महाबळेश्वर १४, मालेगाव १३.४, नाशिक १४.६, सांगली १५.९, सातारा १४.४, सोलापूर १५.२, मुंबई २१.६, सांताक्रुझ १९.४, रत्नागिरी २१.६, पणजी २१.२, डहाणु २०.१, औरंगाबाद १२.१, परभणी ११.४, नांदेड १२.५. अकोला १२.५. अमरावती १२.४, बुलढाणा १२.८, ब्रम्हपूरी १०.९, चंद्रपूर १०.६, गोंदिया ८.२, नागपूर १०.४, वाशिम ११.२, वर्धा ११.