पुणे: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर कमी झाल्याने राज्यात आता उन्हाळाची सुरुवात होत असल्याची जाणीव होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बऱ्याच ठिकाणच्या तापमानात वाढ होत आहे. पुण्यात सध्या अल्हाददायक वातावरण असून, राज्यातील सर्वात कमी किमान तापमान पुण्यात १३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या २-३ दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३५.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
पुणे शहरात सध्या दिवसात काहीसा उकाडा व सायंकाळनंतर गारवा जाणवतो. उपनगरात रात्रीच्यावेळी थंड वाऱ्यामुळे थंडी जाणवावी इतका गारवा असतो. शहरातील कमाल तापमान ३३.६ अंशावर गेले असून, ते सरासरीपेक्षा १ अंशाने अधिक आहे. पुढील काही दिवस ते ३३ अंशांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी रात्रीचे तापमान सरासरीइतके दिसून येत आहे.
त्यात पुढील दोन दिवसांनंतर वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे तापमान- १३ अंश सेल्सिअस