पुणे : शहरातील तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीवर गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात तापमान चढ-उतार होत आहे. त्यामुळे पुणेकरांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुढील दोन-तीन दिवसांत तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
गेल्या आठवड्यात तापमान काहीसे उतरले होते. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला होता. चाळिशीपार गेलेले तापमान ३५ ते ३८ अंशांवर नोंदविले जात होते; पण आता पुन्हा तापमान वाढत आहे. किमान तापमानही २५ अंशांवर नोंदविले जात आहे. त्यामुळे चांगलाच उकाडा जाणवत आहे. घराबाहेर पडल्यानंतर उन्हाच्या झळा अंगाला झोंबत आहेत. म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.
दरम्यान, शुक्रवारी कोरेगाव पार्क ४१.४ आणि मगरपट्टा ४०.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हे तापमान येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. २३ मेपर्यंत शहरातील आकाश निरभ्र राहणार असून, २४ मेपासून मात्र दुपारी निरभ्र आकाश आणि सायंकाळी ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे.
शहरातील कमाल तापमान
कोरेगाव पार्क : ४१.४
वडगावशेरी : ४१.३
मगरपट्टा : ४०.८
हडपसर : ४०.१
शिवाजीनगर : ३९.७