पुणे : उन्हाळा कडक राहणार असल्याचा हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाचा पुणेकर यंदा अनुभव घेत आहेत. गेले काही दिवस शहराचे कमाल व किमान तापमान सरासरीच्या तुलनेत सातत्याने अधिक राहत आहे. त्यात हवामान विभागाने पुण्यातील कमाल तापमान ४१ अंशांवर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आणखी कडक उन्हाळा सहन करण्याची तयारी पुणेकरांना करावी लागणार आहे.
सध्या दुपार होताच अंगावर चटका बसावा, असे उन्ह जाणवत असते. त्यामुळे शहरातील रहदारीही मंदावलेली दिसून येते. गेल्या वर्षी लॉकडाऊन असताना ४० अंशांवर तापमान गेले नव्हते. एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक कमाल तापमान ६ एप्रिल रोजी ३९.६ अंश नोंदविले गेले होते. २०२० मध्ये २९ एप्रिलला ४०.१ अंश सेल्सिअस तापमान होते. २०१९ मध्य २९ एप्रिल रोजी ४३ अंशांपर्यंत पारा चढला होता.
यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य आग ओकत आहे. ७ व ८ एप्रिल रोजी शहरात ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. गेले १५ दिवस सातत्याने कमाल तापमान ३९ अंशांच्या पुढे राहिले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी (दि. १८) शहरातील कमाल तापमान ४१ व किमान तापमान २२ अंश राहण्याची शक्यता आहे. १९ एप्रिल रोजी ४०/२२, २० व २१ एप्रिल रोजी ३९/२३ तर २२ एप्रिल रोजी ३९/२४ आणि २३ एप्रिल रोजी ३८ /२५ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे पाहता, पुढील दोन दिवस शहरात दिवसा वाढते तापमान राहणार असून, पुढे रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.