--
जेजुरी : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील धान्य दिवे येथील शासकीय गोदामातून सासवडला पोहोचवण्याऐवजी जेजुरी येथे नेल्याबद्दल पुरंदर महसूल विभागाकडून टेम्पोचालकांवर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: २१ मे रोजी दिवे (ता. पुरंदर) येथून शासकीय गोदामातून प्रधानमंत्री गरीब कल्याण धान्य योजनेतील रेशनिंगचे धान्य सासवड येथील स्वस्त धान्य दुकानदार रिजवान बागवान आणि अनिल माने यांना पोहोचवण्यात येणार होते. यासाठी टेम्पो (एमएच १४ सीपी ३८८५) मध्ये १०० क्विंटल गहू आणि ६५.५ क्विंटल तांदूळ भरण्यात आला होता. टेम्पोचालक बाळू भिवा मदने याने भरलेला माल सासवड येथे खाली करण्याऐवजी जेजुरीत आणला होता. जेजुरीतील एका हॉटेल समोर हा टेपो उभा होता. टेम्पोत रेशनिंग धान्य असल्याचे समजल्याने तेथे काही लोक जमा झाल्याची माहिती जेजुरी पोलिसांना समाजल्यावरून पोलीस उप निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह त्या ठिकाणी जाऊन टेम्पोचालकांकडे चौकशी केली असता त्याच्याकडून विसंगत उत्तरे आल्याने सदर टेम्पोतील मालासह सुमारे ३ लाख ९९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जेजुरी पोलीस ठाण्यात आणला. याबाबत पुरंदरच्या महसूल विभागाचे पुरवठा अधिकारी सुधीर बडदे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. चौकशीत टेम्पोचालकाने सासवड येथे पोहोचवण्यात येणारा शासकीय माल जेजुरीत नेऊन कामात हलगर्जी पणा केल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे तपास करत आहेत.
--
काही प्रश्न अनुत्तरितच..
२१ मे रोजी पकडलेला टेम्पोची माहिती घेऊन दोन दिवसांनी पुरंदरच्या महसूल विभागाने आज जेजुरीत गुन्हा दाखल केला. पुरवठा अधिकाऱ्यांनी एवढा वेळा का घेतला? त्याच बरोबर रेशनिंग धान्याचा काळाबाजार करण्यासाठीच हा मला जेजुरीत आणण्यात आला असावा, अशीच चर्चा सर्वत्र आहे. नेमके काय याचे उत्तर चौकशीतूनच समोर येणार आहे .
--
फोटो : २५जेजूरी धान्य ट्रक
फोटो ओळी : जेजुरी येथील धान्याचा केलेला टेम्पो.