लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवून टेम्पोचालकाला लुबाडल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली.
गौरव सुरेश पासलकर (वय २२, रा. वारजे), मंगेश विजय जडीतकर (वय २०, रा. दांगट पाटीलनगर, नर्हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदार पल्या चौधरी आणि राजू गेहलोत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी विकास जानावळे (वय २६, रा. गोकुळनगर, पठार, वारजे) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना वारजे येथील यश मित्र मंडळ चौकात शनिवारी रात्री ११ वाजता घडली होती. विकास जानावळे हा आपल्या आईला घेऊन टेम्पोने जात होता. तेव्हा चौघांनी त्यांना अडवले़ विकास याला टेम्पोतून खाली ओढून त्याच्या मानेवर कोयता लावून त्याच्याकडील ३ हजार ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याच्या आईने पैसे द्यावेत, म्हणून त्यांना दगड मारुन जखमी केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक मदतीसाठी येऊ लागले. तेव्हा त्यांनी लोकांना कोयत्याचा धाक दाखवून पळवून लावले. गौरव आणि मंगेश हे दोघे सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.