शेलपिंपळगाव : चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावरील शेलपिंपळगाव (ता.खेड) हद्दीत भीमाभामा नदीच्या पुलावरून एक मालवाहू टेम्पो वाहतुकीदरम्यान थेट नदी पात्रात कोसळला. अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे तर टेम्पोने मुंबईला जाणारा प्रवाशी जागीच ठार झाला आहे. क्षितिज शिवाजी केसरकर (वय ३०, रा.भोईसर मुंबई) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी (दि.१५) सकाळी सातच्या सुमारास झाला. अपघातातग्रस्त वाहन (एमएच ४८ बीएम १३८८) शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे जात होते. मात्र शेलपिंपळगाव हद्दीत चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पाे पूलाचा कठडा ताेडून 40 ते 50 फूट खाेल नदीपात्रात काेसळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टेम्पाे चालक संजय नरेंद्र राय (वय ३२ रा. मुंबई, भोईसर) यांस बाहेर काढले. शेलगावचे सरपंच नागेश आवटे यांनी स्वतः पुढाकार घेऊन रुग्णवाहिकेच्या साह्याने त्यांना उपचारासाठी चाकणला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान स्थानिकांच्या मदतीने नदीत पडलेला टेम्पो क्रेनच्या साह्याने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. मात्र त्यावेळी वाहनात अन्य एकजण असल्याची माहिती समोर आली. स्थानिकांनी त्यास बाहेर काढले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. घटनास्थळी सहाय्यक फौजदार दत्ता जाधव, हवालदार अमोल रावते, नामदेव जाधव यांनी वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने पुलावर सुरक्षा भिंत घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ठोस उपायांची गरजभीमा - भामा नदीवरील पुलाचा रस्ता अरुंद आहे. त्यातच पुलाच्या कठड्यांचे पाईप भक्कम नसल्याने वारंवार वाहने पुलाला धडकून नदीत कोसळली जात आहे. आजची ही तिसरी घटना आहे. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता म्हणून पुलाच्या कठड्यांची कायमस्वरूपी मजबुती करणे अत्यावश्यक आहे.