पुणे : पुण्याच्या वाकडेवाडी भागात केवळ दुचाकींसाठी असणाऱ्या भुयारी मार्गात माल वाहतूक करणारा टेंपाे शिरल्याने काही काळ या ठिकाणी वाहतूक काेंडी झाली हाेती. वाकडेवाडी अाणि नरवीर तानाजी वाडीला जाेडणाऱ्या या भुयारी मार्गात केवळ दुचाकींना परवानगी असताना अनेक चारचाकी वाहने यातून जात असल्याने अनेकदा येथे वाहतूक काेंडी हाेत असते.
वाकडेवाडीतल्या भुयारी मार्गात अाज दुपारी एक टेंपाे शिरला. भुयारी मार्गात प्रवेश केल्यानंतर भुयारी मार्गाच्या कमी उंचीमुळे टेंपाे अडत असल्याचे लक्षात येताच टेंपाे चालकाने ताे मागे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकीं चालकांना अापली वाहने मागे घ्यावी लागली. एका पाेलिसाच्या निदर्शनास ही बाब येताच त्याने हा टेंपाे बाहेर काढण्यास मदत केली. वाकडेवाडीतील भुयारी मार्गात सातत्याने चारचाकी तसेच मालवाहतूक करणारी वाहने प्रवेश करत असल्याने येथील नागरिकांना वाहतूक काेंडीचा सामना करावा लागताे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एका एसटी चालकाने नरवीर तानाजी वाडीच्या बाजूने एसटीच या भुयारी मार्गातून नेण्याचा प्रयत्न केला हाेता. भुयारीमार्गात केवळ दुचाकींनाच प्रवेश असल्याचे फलक सर्व ठिकाणी लावण्यात अाले अाहेत. तरीही अनेक चारचाकी चालक त्याकडे दुर्लक्ष करत अापली वाहने या मार्गातून नेत असतात. या मार्गाची उंची कमी असल्याने, त्याचबराेबर हा भुयारीमार्ग बंदिस्त असल्याने एखादे चारचाकी वाहन बंद पडल्यास त्याला बाहेर काढणे अवघड जाते. तसेच त्यामुळे वाहतूक काेंडी देखील हाेत असते.
दरम्यान अनेकदा वाहतूक पाेलिसांकडून या मार्गातून जाणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येत असते. पूर्वी ज्या ठिकाणी हा भूयारी मार्ग सुरु हाेताे, तेथे लाेखंडी खांब लावून केवळ दुचाकी जातील अशी व्यवस्था करण्यात अाली हाेती. परंतु नंतर ते खांब काढून टाकण्यात अाले. त्यामुळे पुन्हा सर्वप्रकराची वाहने या मार्गात प्रवेश करत अाहेत.