नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील भोर-मांढरदेवी रस्त्यावरील गोकवडी ओढ्यावरील पुलाचे काम दीड वर्षांपासून रखडले होते. या वर्षीच्या पावसाने या पुलाचा भराव वाहून गेला होता. त्यामुळे वाहतुकीला या मार्गावरून धोक्याचे संकेत मिळत होते. मात्र ‘लोकमत’ने दखल घेऊन ‘गोकवडी पूल दीड वर्षापासून रखडलेला’ अशी बातमी शुक्रवारी (दि. ६) प्रसिद्ध झाली होती. याचा परिणाम होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित तात्पुरत्या स्वरूपात पुलाचा तुटलेला भराव, नामफलक दुरुस्ती, रिफ्लेक्टर बसविणे अशी कामे केली आहेत.दि़ १२, १३ जानेवारीला मांढरदेवी काळुबाईदेवीची यात्रा चालू होत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात़ भोरवरून मांढरदेवीला जाण्यासाठी भोर-आंबाडखिंडमार्गे मांढरदेवीला जाण्यासाठी एकच महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावरून प्रवाशांची रहदारी असते़ सार्वजनिक बांधकाम विभागाने येणाऱ्या प्रवासी यात्रेकंरूचा यात्राकाळात प्रवास सुरळीत होण्यासाठी वाहतूक मार्गावरील बाजूपट्ट्यांचे गवत साफ करणे, योग्य त्या ठिकाणी नामफलक लावणे, रिफ्लेक्टर बसविणे, तुटलेल्या पुलांचा भराव भरणे, दिशादर्शक फलक बसविणे अशा प्रकारची महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत़(वार्ताहर)
गोकवडी पुलाची तात्पुरती दुरुस्ती
By admin | Published: January 10, 2017 2:37 AM