पुणे शहरातील रस्ते ८ दिवसांत पूर्ववत होतील असं आश्वासन महापालिकेने दिलं होतं. पण ते कागदावरच राहीलं आहे. महापालिकेने खोदलेल्या रस्त्यांची फक्त तात्पुरती डागडुजी केलेली पाहायला मिळत आहे. रस्ते पुर्ववत करण्याचे काम सुरू असून उद्या पुन्हा आढावा घेतला जाईल असे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले.
पुणे शहर अक्षरशः खड्ड्यात गेलं आहे अशी परिस्थिती शहरातील अनेक भागांमध्ये पाहायला मिळत होती. वेगवेगळ्या कामांसाठी खोदलेले रस्ते पावसाला सुरुवात झाली तरी पुर्ववत झाले नव्हते. या रस्त्यांचे जिथे खोदले आहे तिथे काँक्रीटीकरण करून दुरुस्त केले जातील असे आश्वासन महापालिकेच्या नेत्यांनी दिले होते.
प्रत्यक्षात मात्र या आश्वासनाला १५ दिवस उलटल्यानंतही रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी केलेली पाहायला मिळत आहे. शहरातल्या बहुतांश रस्त्यांवर जिथे खोदाई केलेली होती तिथे खड्डे तर बुजवले गेले आहेत. पण तिथे काँक्रिट तर दूरच साधे डांबरीकरण देखील करण्यात आलेले नाहीये. त्यामुळे खोदाई केलेल्या रस्त्यांवर मातीचे थर साचलेले पाहायला मिळत आहेत. पावसाने चिखल होऊन गाड्या घसरून पडायची शक्यता निर्माण झाली आहे. या भागावरून गाड्या नेणे नागरिक टाळत असल्याने ट्रॅफिक जॅम देखील होत आहे. त्यामुळे महापालिकेचा आश्वासनांचे नेमके काय झाले असा सवाल नागरीक विचारात आहेत.
याबाबत सभागृह नेते गणेश बिडकर, ज्यांनी ८ दिवसांत रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते , त्यांना याबाबत विचारल्यावर ते म्हणाले ,"रस्ते दुरुस्ती सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणेच होत आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र तरीदेखील एकुण परिस्थितीचा उद्या पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल आणि त्याप्रमाणे सूचना दिल्या जातील."