पुणे : स्थानिक वातावरणात होत असलेले बदल व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले महाचक्रीवादळ यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला पुणे शहरातील तापमान सरासरीपेक्षा कमी किंवा जवळपास राहिले होते. आता हवामान कोरडे झाल्याने कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.सोमवारी पुण्यातील कमाल तापमानाने पुन्हा एकदा चाळीशी पार केली आहे. सोमवारी पुणे शहरात कमाल तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. तर, लोहगावमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे.
पुणे शहरात साधारण १५ मे नंतर सायंकाळनंतर आकाशात ढगाळ होऊन पूर्वमौसमी पाऊस होत असतो. यंदा तसा पाऊस अगोदरच झाला आहे. मात्र, गेल्या १० वर्षात प्रथमच मे महिन्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.यापूर्वी १९ मे २०१० रोजी ४१.९ अंश सेल्सिअस, १८ मे २००९ रोजी ४०.३ अंश सेल्सिअस, १८ मे २०११ रोजी ४०.४ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान होते. २० मे नंतर पुण्यातील तापमान कमी होत जाते, हा यापूर्वीचा अनुभव आहे. पुढील दोन दिवस कमाल व किमान तापमान ४० व २४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे़ ३० व ३१ मे रोजी दुपारनंतर मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.