पुणे : कमी किंमतीत युनायटेड अरब अमिराती (यु ए ई) देशाचे चलन दिरहम हे विकत घेण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडला. २ लाख रुपये गेलेच पण चलनाऐवजी धुण्याच्या साबणाचा गोळा हातात पडला.
या प्रकरणी आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या एका २८ वर्षाच्या तरुणानं बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना दोघांनी कमी किंमतीत यु ए ई देशाचे चलन दिरहम हे देण्याचा बहाणा केला. त्यानुसार त्यांना २ लाख रुपये घेऊन अप्पर कोंढवा रोडवरील जगताप डेअरी येथील साईनगर गल्लीत बोलावलं. त्यानुसार ते १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता पैसे घेऊन तेथे गेले.
त्यांच्याशी मोबाईलवर बोलणारा एक जण व त्याचा साथीदार तेथे आला. त्यांनी फिर्यादीकडे नायलॉनची पिशवी दिली. त्यांनी नायलॉनच्या पिशवीतील गठ्ठा सोडून पाहण्याचा प्रयत्न करताच त्यांच्या हातातून ५०० रुपये व २ हजार रुपयांचे नोटा असलेली २ लाख १ हजार रुपये रोख रक्कम असलेली प्लॉस्टिकची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यांना हाताने धक्का देऊन जमिनीवर पाडून ते पळून गेले.
फिर्यादी यांनी नायलॉनच्या पिशवीतील गठ्ठा उघडून पाहिला असता त्यात व्हिल कंपनीचे कपडे धुण्याचे साबणाला गोलाकार देऊन त्यावर इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र गुंडाळून दोन हात रुमालाने बांधलेला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरही ते घाबरले असल्याने त्यांनी तक्रार दिली नव्हती. शेवटी काल त्यांनी तक्रार दिल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर अधिक तपास करीत आहेत.