लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘महाराज गरीब लोकांना पैसे वाटत आहेत,’ असे म्हणत महिलांना पर्समध्ये दागिने ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. असे सांगत तिघा चोरट्यांनी महिलेची ४७ हजार रुपयांची ऐवज असलेली पर्स लांबविली.
याप्रकरणी दांडेकर पूल येथे राहणाऱ्या ५० वर्षांच्या महिलेने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना स्वारगेट येथील कात्रज बसस्टॉपजवळ मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली. ही महिला पायी जात असताना एक जण त्यांच्याजवळ आला. त्याने येथे ‘एक महाराज गरीब लोकांना पैसे वाटत आहेत’, असे सांगून त्यांच्या विश्वास संपादन केला. त्यांना कात्रज बसस्टॉपवर नेऊन आणखी दोघे तेथे आले.
‘तुमच्याजवळ सोन्याचे दागिने आहेत. ते पाहिल्यावर महाराज पैसे देणार नाहीत. तुमच्या जवळील दागिने काढून ठेवा,’ असे सांगितले. त्यावर या महिलेने त्यांच्याजवळील १० ग्रॅमचे सोन्याचे गंठण व १५ हजार रुपये रोख रक्कम असलेल्या पर्समध्ये ठेवण्याचा बहाणा करुन ती पर्स बॅगमध्ये न ठेवता दुसरीच पिशवी ठेवून पिशवी महिलेला दिली. त्यानंतर ते पळून गेले. या महिलेने पिशवी उघडून पाहिली तर त्यात त्यांची पर्स तसेच गंठण, १५ हजार रुपये असा ४७ हजार रुपयांचा ऐवज नव्हता. पोलीस उपनिरीक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.