पुणे : गुगलवर रिव्ह्यू देण्याचे काम आहे असे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत लोहगाव परिसरात राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार हा प्रकार २७ डिसेंबर २०२३ ते ३० डिसेंबर २०२३ यादरम्यान घडला आहे.
महिलेला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधून गुगलवर रिव्ह्यू देण्याचे काम देऊन त्यामार्फत पैसे मिळविता येतील असे आमिष दाखवले. महिलेला सुरुवातील मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर आणखी पैसे मिळू शकतात असे आमिष दाखवून महिलेला प्रीपेड टास्क करण्याचे सांगितले. त्याप्रमाणे महिलेने प्रीपेड टास्क करण्यास सुरुवात केल्यावर वेगवेगळी कारणे देऊन पैसे उकळण्यास सुरुवात केली.
एकूण १० लाख ४८ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. काही कालावधीनंतर पैसे भरूनही मोबदला देण्याचे बंद केल्याने महिलेने विचारणा केली. त्यावेळी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांकावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संगीता माळी या पुढील तपास करत आहेत.