पाटस : दहा मुख्यमंत्री आले, तरी दौंड तालुक्यात राष्ट्रवादीला अडचण येणार नाही, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.पाटस (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. दौंड तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वेळा येऊन गेले. त्यांनी केलेल्या घोषणांपैकी एक तरी घोषणा पूर्ण केली का? असा प्रश्न विचारून ‘फडणवीस हे फसवणीस मुख्यमंत्री आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. तेव्हा ही लोकशाही आहे की हुकूमशाही? एकीकडे पाकिस्तानबरोबर युद्ध करायची भाषा करतात आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा तसेच साखर आयात करतात, ही कुठली राजनीती आहे? असा सवाल त्यांनी केला.पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, अप्पासाहेब पवार, विकास ताकवणे, शांताराम बांदल, तात्यासाहेब टेळे, शंकर मगर, मंगेश रायकर, बन्सीलाल फडतरे यांची भाषणे झाली. नितीन शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. विकास खळदकर यांनी आभार मानले.या वेळी वैशाली नागवडे, सभापती ताराबाई देवकाते, उपसभापती प्रकाश नवले, वीरधवल जगदाळे, गुरुमुख नारंग, सोहेल खान, दिलीप हंडाळ, आनंद थोरात, सत्त्वशील शितोळे, योगिनी दिवेकर, वैशाली धगाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते...........पाटील भावी मुख्यमंत्री म्हणून वावरू लागलेत!प्रदीप गारटकर म्हणाले, की हर्षवर्धन पाटील राजकीयदृष्ट्या अडचणीत होते म्हणून ते भाजपत गेले आणि भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत.वास्तविक, गेल्या विधानसभेला भाजपत जाण्याचा त्यांचा निर्णय झाला होता. त्यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय आता अमलात आला; मात्र खापर राष्ट्रवादीवर फोडत आहेत. काँग्रेस पक्ष वाढविण्याकडे दुर्लक्ष करणारे हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय भवितव्य अंधारात आहे.
दहा मुख्यमंत्री आले, तरी दौंडमध्ये अडचण नाही: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 1:42 PM
दौंड तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वेळा येऊन गेले. त्यांनी केलेल्या घोषणांपैकी एक तरी पूर्ण केली का?
ठळक मुद्देफडणवीस, नव्हे फसवणीस