पुणे : कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) मधील एकही विद्यार्थी पैशांआभावी शिक्षण, अन्न व शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांसाठी सीओईपीने अॅल्युमनी असोसिएशनच्या माध्यमातून ‘स्टुडंट सपोर्ट क्लब’ स्थापन करण्यात आला. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून दोन तासांच्या आत तब्बल १० लाख रुपयांचा निधी जमा झाला.
सीओईपी अॅल्युमनी असोसिएशन आणि सीओईपी सीएक्सओ क्लबतर्फे आयोजित ऑनलाईन ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ वितरण सोहळ्यात या अभिनव उपक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दोन तासांतच सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास सीओईपीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक डॉ. बी. बी. अहुजा, सीओईपी अॅल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष भरत गिते, सचिव सुजित परदेशी, खजिनदार अंकिता चोरडिया, सदस्य प्रा. एस. डी. आगाशे, मोहित गुंदेचा व अनुप साबळे आदी उपस्थित होते.
भारतीय नौदलातील रिअर अडमिरल आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव विकास खरगे, अम्फोनल इंडियाचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट जॉन, आयएसबी हैदराबादचे उपअधिष्ठाता मिलिंद सोहोनी, एमआयटी अमेरिकेचे सहायक प्राध्यापक रमेश रासकर यांना तसेच २०२०-२१ तर भारतातील पहिल्या सेल मशिनचे डिझायनर एच. ई. गोडबोले, पुणे मेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये, प्राप्तिकर खात्याचे अतिरिक्त संचालक संदीपकुमार साळुंखे, जिओसॅटचे प्रोग्रॅम संचालक व्ही. आर. कट्टी यांना २०१९-२० साठी सीओईपी अभिमान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.