पुणे : नऱ्हे गावात व्यवसाय करण्यासाठी कंपनी सुरु करणाऱ्या व्यावसायिकाला कंपनीत भागीदारी दे नाही तर दरमहा १० लाख रुपये खंडणी दे, अशी मागणी करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य व त्याच्या कार्यकर्त्यांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग़्रामपंचायत सदस्य सागर भूमकर व विकी पोकळ, कृष्णा कडू, घनशाम हिवाळे आणि त्यांचे इतर साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी एका २६ वर्षांच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे़. काही महिन्यांपूर्वी फिर्यादी हे व्यावसायासाठी पुण्यात आले. ते नवीन कपडे तयार करुन त्याचे मार्केटिग करतात़. त्यांनी नऱ्हे गावात आपली कंपनी सुरु केली आहे़. सागर भूमकर हे ग्रामपंचायत सदस्य आहेत़. गेल्या महिन्यात त्यांना विकी पोकळ याचा फोन आला व त्याने खंडणीची मागणी केली़. त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी सागर भूमकर यांनी फोन करुन त्यांना झील चौकातील आपल्या आॅफिसमध्ये बोलावले़. त्यावेळी त्यांच्यासोबत विकी पोकळ, कृष्णा कडू, घनशाम हिवाळे व इतर जण होते़ त्यांनी कंपनीमध्ये आम्हाला भागीदारी दे असे सांगितले़ नाही तर दरमहा १० लाख रुपये खंडणी दे़ नाही तर तुझे बरे वाईट करुन तुझी कंपनी बंद पाडतो, तुला व तुझ्या कुंटुबियांना गोळ्या घालीन अशी धमकी दिली़. याप्रकरणी त्यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे गेल्या महिन्यात तक्रार अर्ज दिला होता़. त्यानंतर त्यानुुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. नऱ्हे ग्रामपंचायतीमध्ये सध्या सागर भूमकर याचे पॅनल निवडून आले आहे़.