लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी एमबीबीएस डॉक्टर भरती करता ९० हजार रुपये पगाराची मोठी ऑफर दिल्यानंतर मंगळवार (दि.२०) रोजी म्हणजेच पहिल्याच दिवशी दहा एमबीबीएस डॉक्टर मिळाले असून, त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहे.
कोरोना महामारीत ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर, कोविड हाॅस्पिटल साठी जाहिरात देऊनही एमबीबीएस आणि एमडी दर्जाचे डॉक्टर मिळत नव्हते. जिल्हा परिषदेने दोन दिवसापूर्वी एमबीबीएस डॉक्टरसाठी तब्बल नव्वद हजार रुपये आणि एमडी डाॅक्टरसाठी तब्बल दीड लाख पगार देण्याची ऑफर देऊन देशातील बारा राज्यांमध्ये जाहिरात केल्यानंतर पहिल्या दिवशी ३० एमबीबीएस डॉक्टरांनी प्रतिसाद दिला.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र कोरोना हॉस्पिटल मध्ये काम करण्यासाठी रिक्त जागा दाखवून त्यांना काम करण्याची संधी देण्यात आली दहा एमबीबीएस डॉक्टरांनी तात्काळ हजर होण्याची तयारी दर्शवली त्यानंतर सायंकाळी त्यांना तात्काळ नेमणूक पत्र देण्यात आले. पुढील तीन महिन्यांसाठी या डॉक्टरांच्या नेमणुका आहेत, जाहिरातीत घोषित केल्या प्रमाणे आणखी दोन दिवस ही डॉक्टरांची भरती सुरू राहणार आहे. आणखीन डॉक्टरांच्या प्रतिसाद त्यासाठी मिळेल. पात्रता पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना तात्काळ नेमणूक पत्र दिले जाईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रथमच महाराष्ट्राबरोबर बारा राज्यांमध्ये डॉक्टर भरतीची जाहिरात केली होती . पगाराची जम्बो ऑफर देखील देण्यात आल्याने डॉक्टर भरतीला पहिल्या दिवशी प्रतिसाद मिळाला.सर्व डॉक्टर महाराष्ट्रातील असून, काही परराज्यातील डॉक्टरांनी देखील संपर्क साधला आहे. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले.