लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू हाेण्याच्या निर्धारित वेळेच्या दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्याची पद्धत बंद केली. मात्र, परीक्षेच्या वेळेत दहा मिनिटांनी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी मंडळाने घेतला. पालक, विद्यार्थ्यांनी केलेली मागणी आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत, हा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
परीक्षा सुरू असताना माेबाइल, तसेच समाजमाध्यमांवर प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे काही प्रकार निदर्शनास आले हाेते. त्या पार्श्वभूमीवर पेपरफुटींच्या अफवांना प्रतिबंध घालणे, तसेच भयमुक्त आणि काॅपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगाेदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय १० फेब्रुवारी राेजी घेतला हाेता. विद्यार्थी-पालकांमध्ये याविराेधात नाराजीचा सूर दिसत हाेता. त्यामुळे मंडळाने पुन्हा प्रसिद्धीपत्रक काढले आणि परीक्षेच्या एकूण वेळेत दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांनी काय करावे?विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पाेहोचावे. सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता उपस्थित राहावे. त्यानंतर, परीक्षा दालनात सकाळी ११, तसेच दुपारी ३ वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण व लेखनास प्रारंभ हाेणार आहे.