लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण जिल्ह्यातच कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. याचसोबत रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण देखील वाढले असून, ऑक्सिजनच्या मागणीत अनेक पटीने वाढ झाली आहे. सध्या शंभर टक्के निर्माण होणारा ऑक्सिजन आरोग्यासाठी खर्च केला जात असला, तरी ऑक्सिजन कमीच पडत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीन पाऊल उचलले असून, आता जिल्हा नियोजन समितीमधून जिल्ह्यात दहा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे पाच ते सहा कोटींच्या प्रशासकीय कामांना मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ आराखड्यातील ३० टक्के निधी कोविड-१९ आजार उपाययोजनाकरिता खर्च करणे बंधनकारक केले आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा निधी अर्थसंकल्पित करणे, तरतुदीचे वितरण व प्रशासकीय मान्यता प्रदान करणे (स्थानिक स्वराज्य संस्था वगळून) तसेच पुनर्नियोजन करणे इत्यादी बाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन व यासाठी आवश्यक असलेले आरोग्य संस्थेतील कोविड- १९ च्या बाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याकरिता ‘मेडिकल ग्रेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सिस्टम’ कार्यान्वयित करण्यासाठी पाच ते सहा कोटी रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ऑक्सिजन प्लॅन्टचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.