पुणे : गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये डीजे लावून आणि दिलेला मार्ग अचानक बदलून उलट दिशेला मिरवणूक काढून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मंडळाच्या दहा पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवर बुधवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नागेश तुकाराम दरगुडे (वय ४२, रा. मंगळवार पेठ), सत्यजित बाळासाहेब कराड ( वय २९, रा.धनकवडी), राजेश सुभाष मेनन (वय २५, रा. पर्वतीगाव), महेश शाहु मोहिते (वय २५ , जनता वसाहत), जितेंद्र गोविंद जोशी (वय ४७, रा. जनवाडी), प्रतिक प्रमोदसिंग जव्हेरी (वय २९, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड), विश्वनाथ आण्णा साबळे (वय २९, रा. जनवाडी, गोखलेनगर), निलेश आनंद कांबळे (वय ३५), तपन विठ्ठल कानडे (वय २४, दोघे रा. बुधवार पेठ) आणि अनिकेत किशोर शहाणे (वय २७,रा. घोरपडे पेठ) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभि इॅम्पॅक्ट लॉजिस्टिक्स सोल्युशन प्रा.लि.बाणेर या कंपनीचे मालक, गणपती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनानी बुधवारी रात्री फर्ग्युसन कॉलेज रोडवर कंपनीत बसविलेल्या गणपती मूतीर्ची ट्रॅक्टरवर विसर्जन मिरवणूक काढली होती. यावेळी एका टेम्पोमध्ये डीजेही लावण्यात आला होता. तसेच ५० वादकांचे ढोलताशा पथक, बाउंसर आणि कामगार असे एकुण दीडशे ते दोनशे जण एकत्र येवून फर्ग्युसन रोडवरील वाहतूक अडवून बंद केली. ऐनवेळी मिरवणूकीसाठी दिलेला मार्ग बदलून आदेशाचा भंग करत फर्ग्युसन रोडवर ज्ञानेश्वर पादुका चौकाकडून उलट दिशेने गणपतीची मिरवणूक काढली असल्याचे पोलिसांतर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करून बुधवारी रात्री मंडळाच्या दहा पदाधिकाऱ्यांना अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी काटे करीत आहेत.
मिरवणुकीत नियमभंग करणा-या मंडळाच्या दहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 9:45 PM
गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये डीजे लावून आणि दिलेला मार्ग अचानक बदलून उलट दिशेला मिरवणूक काढून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मंडळाच्या दहा पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे.
ठळक मुद्देफर्ग्युसन कॉलेज रोडवरील प्रकार: डीजे लावून वाहतुकीस अडथळा