पुणे : जमिनीच्या हव्यासापोटी दोन सख्ख्या भाच्यांचा खून करणाऱ्या आत्यासह दहा जणांना पुणे सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष के. कऱ्हाळे यांनी हा निकाल दिला आहे आहे.
यात नामदेव दगडु भगत (वय, 62), चिनकी नामदेव भगत (52), ज्ञानदेव नामदेव भगत (31), श्रीनाथ नामदेव भगत (29 चौघेही रा. बहिरवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे), मयूर दिलीप भेलके (25, रा. भोई आळी, भोर), समीर गुलाब किवळे (25, रा. भेलकेआळी, भोर), आदर्श चंद्रकांत सागळे (26, नवी आळी, भोर), शरीफ हनिफ आतार (25, रा. पावगेचाळ, नागोबा आळी, ता. भोर, जि. पुणे), श्रीकांत शांताराम सणस (26, रा. भोरेश्वरनगर, भोर), अनिकेत संपत मोरे (25, भेलकेआळी,भोर) या दोषींचा समावेश आहे.
ही घटना ७ मे २०१२ रोजी पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथे घडली. आतकारवाडी येथे राहणारे बाजीराव आणि मारुती पांगसे या दोन सख्ख्या भावंडांचा खून झाल्याची फिर्याद अनिता बाजीराव पांगसे यांनी दिली होती. त्यानुसार अटक करण्यात आलेल्या चिनकी भगत या पांगसे यांच्या आत्या आहेत. त्यांचा व पांगसे बंधूंचचे सिंहगड पायथ्याशी डोणजे गावात असलेल्या जमिनीच्या वाटपातून वाद होता. प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी आरोपींनी कुर्हाडी, कोयत्या, लोखंडी गज आणि लाठ्या काठ्यांनी बाजीराव आणि मारुती यांना मारहाण केली. यात बाजीराव आणि मारूती गंभीर जखमी झाले. या दोघांनाही सासवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी अकरा साक्षीदार तपासले. त्यांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरुन न्यायालयाने दहा जणांना दुहेरी जन्मठेप आणि ४ हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली.