वडगाव मावळ : पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेलेल्या मावळ तालुक्यातील ३ कुटुंबातील १० व्यक्ती सुखरूप आहेत. दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. वडगाव मावळ येथून चौधरी यात्रा कंपनीच्या बसमधून नेपाळ येथे रवाना झाले. शनिवार दि. २५ रोजी दुपारी १२ वा. नेपाळची राजधानी काठमांडू शहरापासून सुमारे २०० किमी अंतरावरील नारायणी घाट येथे पोहोचले होते. त्याच सुमारास तीव्र भूकंप झाल्याने त्यांना शनिवारी पूर्ण रात्र रस्त्यावर जागून काढावी लागली. चिंतेत असलेले म्हाळसकर व काकरे कुटुंबीय त्यांच्याशी संपर्कामुळे आनंदित झाले असून, ते घरी पोहोचण्याची प्रतीक्षा करत आहेत.वडगावातील संतोष निवृत्ती म्हाळसकर (वय ३२), राणी संतोष म्हाळसकर (वय २८), ओम संतोष म्हाळसकर (९), शिवराज संतोष म्हाळसकर (६), वैशाली पोपट म्हाळसकर (३६), अंशुमन पोपट म्हाळसकर (१४), आविष्कार पोपट म्हाळसकर (१२), जांभूळ येथील शंकर दत्तात्रय काकरे (४०), गौरी शंकर काकरे (३६) व कार्तिक शंकर काकरे (वय १३) उन्हाळी सुटीत पर्यटनासाठी रवाना झाले होते. तेथे तीव्र भूकंपामुळे इमारती, रस्ते व मंदिरे जमीनदोस्त होऊन हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. अनेक नागरिक ढिगाऱ्यात अडकले असून, अनेक जखमी झाल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे या ३ कुटुंबातील १० व्यक्तींसह दोन बसमधील ९० प्रवासी अडकून पडले होते. या परिसरात रात्री बाराला भूकंपाचे पुन्हा हादरे बसण्याचा अंदाज सांगितल्याने प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन पूर्ण रात्र रस्त्यावर जागून काढली.म्हाळसकर यांचे भाऊ सतीश निवृत्ती म्हाळसकर यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दिवसभर संपर्क झाला नसल्याने म्हाळसकर व काकरे कुटुंबीय चिंतेत होते. शेवटी शनिवारी रात्री ११ वा. त्यांच्याशी संपर्क झाला. तहसीलदार शरद पाटील म्हणाले, ‘‘रविवारी पहाटे ५ वा. यात्रा कंपनीच्या दोन बसमधील ९० प्रवासी नारायणी घाट येथून भारतात निघाले असून, त्यांच्यासोबत रविवारी सकाळी ११ वा. संपर्क झाला आहे. ते सुखरूप बिहार राज्यात पोहोचले असून, चार ते पाच दिवसांत घरी पोहोचतील. नेपाळमध्ये फिरण्यास गेलेल्या व्यक्तींची प्रतीक्षा त्यांचे कुटुंबीय करत आहे. या कुटुंबीयांची माहिती शासनाला कळविली आहे.’’
मावळ तालुक्यातील दहा व्यक्ती सुखरूप
By admin | Published: April 27, 2015 4:58 AM