पिंपरी : पिंपरी चिंचवड ओमायक्रॉनमुक्त होत असताना रविवारी आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे परदेशातून आलेले तीन आणि त्यांच्या संपर्कातील सात, असे एकूण दहा जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे. शहरात नायजेरियातून दि. २५ नोव्हेंबरला आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. त्यात दोघांचे अहवाल २९ नोव्हेंबरला कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील दोघांची तपासणी करण्यात आली. त्यात एकाचा अहवाल ३० नोव्हेंबरला पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिघांच्या संपर्कातील सातजण, अशा एकूण दहा जणांना ओमायक्रॉन झाला होता. पहिल्या टप्प्यात सहा आणि उर्वरित चारजण रविवारी ओमायक्रॉनमुक्त झाले. त्याचवेळी रविवारी आणखी एकाचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.
६८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह
आजपर्यंत १००३ परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी केली असून, त्यापैकी ७२८ जणांचे अहवाल आले आहेत. त्यात परदेशातील १९ जण कोरोना पॉझिटिव्ह, तर त्यांच्या संपर्कातील २१ जण पॉझिटिव्ह आले, तर ६८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. परदेशातून आलेल्या चार जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली, तर त्यांच्या संपर्कातील सात जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. आजपर्यंतच्या ११ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १० जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.