पुणे : डाॅ. बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असा संदेश दिला हाेता. शिक्षण हे वाघिनीचे दुध असून ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असेही अांबेडकर म्हणाले हाेते. अांबेडकरांचा हा संदेश पुढच्या पिढीपर्यंत पाेहचविण्यासाठी आंबेडकर जयंतीनिमित्त 'नाचून माेठे हाेण्यापेक्षा वाचून माेठे हाेऊया' हा संकल्प हाती घेण्यात आला अाहे. या अंतर्गत डाॅ. बाबासाहेब अांबेडकर संघर्ष समितीच्या वतीने 14 एप्रिल राेजी महापुरुषांच्या दहा हजार पुस्तकांचे माेफत वाटप करण्यात येणार अाहे. त्यासाठी छत्रपती-फुले-शाहू-अांबेडकर विचाररथ तयार करण्यात आला अाहे.अशी माहिती समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमाचे उद्घाटन बुधवार, दि. ११ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता नालंदा विहार, पद्मावती येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी आमदार भीमराव तापकीर, सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. शशिकांत कांबळे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावशाली विचारांतून प्रेरणा घेऊन युवापिढी घडली पाहिजे. मात्र, आजच्या घडीला जयंती साजरी करण्याची युवकांची पद्धत पाहून आपण खरेच बाबासाहेबांचे अनुयायी आहोत का, असा प्रश्न पडतो. केवळ डीजेपुढे नाचणे म्हणजे जयंती साजरी करणे नव्हे. बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र घेऊन त्यांना अभिप्रेत समाजाची निर्मिती व्हायला हवी. याच विचारांतून यंदाच्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प आम्ही केला आहे. 14 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते सहा या वेळेत सारसबागेसमोरील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ या ‘छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर विचाररथा’मार्फत 10 हजार पुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अॅड. वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, विनायक निम्हण, माजी उपमहापौर दीपक मानकर, गटनेते वसंत मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यांच्या हस्ते हे विचारधन वाटले जाणार आहे.” “जयंतीदिनाच्या आधी 11, 12 व 13 एप्रिल रोजी हा ‘छत्रपती-शाहू-फुले-आंबेडकर विचाररथ’ पुण्यातील विविध दलित वसाहतींमध्ये फिरणार आहे. पर्वती, कासेवाडी, राजेवाडी, ढोले पाटील रोड, विश्रांतवाडी, बोपोडी, औंध, रामनगर, वारजे, धनकवडी, पद्मावती, मंगळवार पेठ, कामगार पुतळा आदी भागातील दलित वसाहतींचा यामध्ये समावेश आहे. या रथाद्वारे पुस्तक वाटपासह जनजागृती केली जाणार आहे. महापुरुषांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही शशिकांत कांबळे यांनी नमूद केले.
अांबेडकर जयंतीनिमित्त राबविण्यात येताेय 'नाचून माेठे हाेण्यापेक्षा वाचून माेठे हाेऊया' उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 7:56 PM