- विश्वास मोरे, पिंपरीपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कारभारावर नियंत्रण नसल्याने मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. नियोजनाचा अभाव आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण न झाल्याने प्राधिकरण मूळ उद्देशापासून भरकटले आहे. संपादन करूनही विकसित न केल्याने सुमारे दोन हजार एकर जागा पडून आहे. शहरात घरांना प्रचंड मागणी असताना प्राधिकरणाकडे जागा असूनही प्रकल्प न उभारल्याने सुमारे दहा हजार कोटींची गुुंतवणूक ठप्प झाली आहे. सुनियोजित शहरासाठी नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली; मात्र गेल्या वीस वर्षांत एकाही गृहप्रकल्पाची निर्मिती झालेली नाही. रस्ते, उद्याने बनविणे या पलीकडे नगरनियोजनाबाबत कोणतीही ठोस धोरणे अवलंबलेली नाहीत. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसांच्या घराचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. प्रशासकीय मानसिकता नसल्याने गृहप्रकल्पांची निर्मिती झालेली नाही. गेल्या ८ वर्षांपासून भोसरी परिसरातील प्राधिकरणाचे अनेक प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राची २५० एकर, सेक्टर बारामधील गृहप्रकल्पासाठी १३२ एकर, याच भागातील अन्य क्षेत्र असे सुमारे चारशे एकर क्षेत्र पडून आहे. त्यावर ४० हजार घरांचे नियोजन प्राधिकरणास करता आले असते. त्यामुळे सुमारे १० हजार कोटींची उलाढाल, गुंतवणूक थांबली आहे. प्रशासक असूनही नाही विकास तेरा वर्षांमध्ये प्राधिकरणात प्रशासकीय राज आहे. लोकनियुक्त समिती नसल्याने प्राधिकरणाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त एस. चोक्मलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त राजीव जाधव विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. तसेच नगररचना संचालक दर्जाचा अधिकारी या संस्थेवर काम करतो. तीन आयएएस अधिकाऱ्यांचे वर्चस्व असूनही नियोजनबद्ध विकास झालेला नाही, हे ढळढळीत वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे विकासाची दृष्टी असणारे अधिकारी येणे गरजेचे आहे. (क्रमश:)
दहा हजार कोटी गुंतवणूक ब्लॉक
By admin | Published: October 06, 2015 4:51 AM