पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य शासनाने मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतेक सर्वच ठिकाणी निर्बंध शिथिल केली आहेत. परंतू पुण्यातील निर्बंध कायम असल्याने व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला आहे. पुण्यातील दुकानाची वेळ सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत वाढवून द्यावी अशी पुणे व्यापारी महासंघातर्फ जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. यासाठी शनिवार (दि.7) रोजी शहरातील तब्बल दहा हजार व्यापा-यांनी आपल्या दुकानांच्या चाव्या प्रशासनाच्या स्वाधीन करत अभिनव पध्दतीने आंदोलन केले.
राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये तसेच पुणे शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर व मृत्यू दर कमी झाला असतानाही पुण्यातील निर्बंध कायम ठेवले आहेत. यामुळे छोटे, मोठे व्यापारी त्रासले आहेत. त्यामुळे आता कारवाईची तमा न बाळगता त्यांनी शांततेने आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. पोलिसांशी आम्ही वाद घालणार नाही पण व्यवसायासाठी दुकानेही बंद करणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दुकाने ४ वाजल्यानंतरही ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास सुरवात केली आहे.व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून, कमी वेळेत, कमी व्यवसायात सर्व टॅक्स, जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रॉप्रर्टी टॅक्स, लाईट बिल, कर्ज, बॅकेचे हप्ते, दुकान व घरभाडे, कर्मचारी पगार, घरखर्च भरून प्रशासनाने सद्य स्थितीत व्यवसाय चालवून दाखवावा असे आवाहन महासंघाने केले.
यासाठीच शहरातील दहा हजारपेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या चाव्या प्रशासनाकडे सुपूर्त करण्यासाठी व्यापारी महासंघाच्या स्वाधीन केल्या. या सर्व चाव्या प्रशासनाकडे सुपूर्त करण्यासाठी व्यापारी महासंघाच्या शिष्ठमंडळाने शनिवार (दि.7) रोजी अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे यांची भेट घेतली. परंतु संजय शिंदे साहेब यांनी विनम्रपणे चाव्या स्वीकारण्यास नकार दिला.
प्रशासकीय दृष्ट्या पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व उर्वरित जिल्हा हे तीनही वेगवेगळे घटक आहेत. पुणे शहरातील करोना रुग्णांची संख्या सतत कमी होत असून निर्बंध मात्र कायम आहेत. मुंबईचा विचार करताना राज्य सरकारने मुंबई महापालिका हद्द असा विचार केला आहे. परंतु पुण्याचा मात्र शहर म्हणून विचार न करता पुणे जिल्हा म्हणून विचार होत असल्याने, लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनही निर्बंध अजूनही शिथिल झाले नाहीत.
पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होईल अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा असून दुर्दैवाने तसा निर्णय न झाल्यास नाईलाजास्तव सोमवारपासूनही दुकाने रात्री ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, मनोज सारडा, नितीन काकडे, भरत शहा, सुरेश जेठवानी, अभय व्होरा, रवींद्र जोशी, प्रमोद शहा, मिलिंद शालघर आदी उपस्थित होते.