शिरुर : दुष्काळामुळे सध्या शेतीतील काळी माती भेगाळली असून, शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. तर दुसरीकडे नद्या कोरड्या पडल्याने थेट नदीपात्रात ट्रक नेऊन वाळूचा बेसुमार अवैध उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे वाळू माफियांची चैन सुुरू झाली आहे. सध्या शिरूर तालुक्यातील कोरड्या भीमा नदीत हा प्रकार राजरोस पाहायला मिळत होता. त्यावर अखेर आज पोलिसांनी कारवाई केली असून, वाळूने भरलेले तब्बल दहा ट्रक जप्त केले आहेत. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील आऊट पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक तारू, योगेश गुंड, धर्मराज खराडे, अक्षय काळे यांच्या पथकाने आज सकाळी दहा ट्रकवर ती कारवाई केली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मांडवगण फराटा परिसरातील भीमा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी शिल्लक न राहिल्यामुळे नदीपात्रातील वाळूवरती वाळूचोरांचा डोळा होता. त्यामुळे त्यांनी गणेगाव दुमाला, बाभुळसर या परिसरात नदीपात्र कोरडे ठाण असल्यामुळे भीमा नदीपात्र अक्षरश: पोखरून टाकली. याच पात्रातील वाळू चोरून दहा ट्रक घेऊन मांडवगणच्या दिशेने येत होते. या वेळी मांडवगण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने या वाळू ट्रकचालकांना अडविले. परंतु ट्रकचालक पोलिसांना गुंगारा देत पसार झाले. नदीपात्र कोरडे पडल्यामुळे वाळूचोरांचा या काळ्या सोन्यावर डोळा असल्यामुळे या भागात दौंड, नगर, पुणे या भागातून वाळू ट्रकची दिवसभर वाहतूक सुरु असते. याबाबत तहसीलदार गुरू बिराजदार, मंडळ अधिकारी प्रसन केदारी, गावकामगार तलाठी पी. बी. कोळगे यांनी पंचनामा केला आहे. सर्व वाहने मांडवगण फराटा औट पोलीस चौकीला उभी केली आहेत. विशेष म्हणजे यातील ट्रक वर नंबरप्लेट नाहीत. त्यामुळे ट्रक कुणाच्या मालकीच्या आहेत याबाबत पोलिसांना माहिती मिळाली नाही. दहा ट्रक वाळूच्या ड्रायव्हरपैकी एकही न सापडल्यामुळे या वाळूचोरांचे रॅकेट मोठे असल्याचे ग्रामस्थ बोलले जात आहे.--दहा ट्रकपैकी एकाचाही चालक सापडला नाही राजरोसपणे सध्या कोरड्या पडलेल्या नद्यांमधील वाळूउपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याच्या बातम्याही अनेक ठिकाणी प्रसिद्ध होत असून, ग्रामस्थांकडून तक्रारी होत आहेत. त्यामुळे आजअखेर मांडवगण फराटा औट पोलिसांनी कारवाई केली. तुटपुंज्या कर्मचाºयांनी दहा ट्रकवर धाडी टाकल्या. त्या वेळी सर्व दहाच्या दहा ट्रकचालक व कर्मचारी पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय ट्रकला नंबरप्लेट नसल्याने एकाही आरोपीचे नाव निष्पन्न झाले नाही. त्यामुळे ही प्रकरणात गौडबंगाल असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. केवळ जप्ती नको तर वाळूमाफियांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाली तरच भविष्यात नदी वाचेल, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.-------अवैध रीतीने होणाऱ्या वाळू चोरावरती कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. आज सापडलेल्या ट्रक कोणाच्या मालकीच्या आहेत त्याचा पोलीस तपास घेत असून, त्यांंच्याविरुद्ध प्रशासनाकडून फिर्याद देण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- गुरूबिराजदार, तहसीलदार, शिरूर
अवैध वाळूचे दहा ट्रक पकडले : शेतकऱ्यांची दैना, वाळूमाफियांची चैन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 8:04 PM
मांडवगण फराटा परिसरातील भीमा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी शिल्लक न राहिल्यामुळे नदीपात्रातील वाळूवरती वाळूचोरांचा डोळा होता.
ठळक मुद्देमांडवगण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने या वाळू ट्रकचालकांना अडविले दहा ट्रकपैकी एकाचाही चालक सापडला नाही अवैध रीतीने होणाऱ्या वाळू चोरावरती कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार