तिकीट दर कमी : दिव्यांग प्रवाशांना व्हीलचेअरसहित डब्यांत प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सामान्य प्रवाशांना देखील वातानुकूलित (एसी) डब्यातून कमी तिकीट दारात प्रवास करता यावा या करिता सर्व सुविधानी युक्त अशा इकॉनॉमी थ्री टिअर डब्यांची निर्मिती केली. देशातील काही प्रमुख झोनला त्याचे वितरण झाले असून सर्वात जास्त डबे पश्चिम रेल्वेला मिळाले तर सर्वात कमी मध्य रेल्वेला देण्यात आले. मात्र याचा वापर कोणत्या गाडीसाठी केला जाईल व तो कधी केला जाईल याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या डब्याचे वैशिट्य असे की याची प्रवासी क्षमता ६४ हुन वाढवून ८३ इतकी आहे. शिवाय त्याचा वेग ताशी १६० किमी इतका आहे.
रायबरेली येथील रेल कोच फॅक्टरी येथे या डब्याची निर्मिती करण्यात आली. पहिल्या टप्यात २५६ डबे तयार करण्यात येणार आहे. पैकी ३२ डबे तयार करून देशातील विविध झोनला ते देण्यात आले. यात पश्चिम रेल्वेला सर्वाधिक १० डबे, उत्तर मध्य रेल्वे ७, उत्तर रेल्वे ३, उत्तर पश्चिम रेल्वे ५ तर सर्वांत कमी मध्य रेल्वेला केवळ दोन डबे देण्यात आले.
या डब्यांचे वैशिष्ट्य असे की याच्या आसन क्षमतेत १९ बर्थने वाढ केली. मात्र त्यासाठी डब्यांच्या लांबीत अथवा रुंदीत कोणताही बदल करण्यात आला नाही. शिवाय दिव्यांगांना सहजरित्या प्रवास करता यावे या करीता डब्यांचे चारपैकी दोन दरवाजांची लांबी थोडी वाढविण्यात आली.
रेल्वे बोर्डने यापूर्वी गरीब रथमध्ये बर्थची संख्या वाढविली होती. मात्र त्याचा त्रास प्रवाशांना होऊ लागल्याने रेल्वे बोर्डने गरीब रथच्या डब्याचे उत्पादन थांबविले. तसा त्रास पुन्हा या डब्यांतील प्रवाशांना होऊ नये म्हणे म्हणून बेडरोल कॅबिनेट काढण्यात आले आहे. त्याच्या जागेचा वापर सीट्ससाठी करण्यात आला आहे. सध्या एसी ३ टिअरमध्ये सध्या ६४ बर्थ आहेत. नव्या डब्यांत ८३ बर्थ असणार आहे. म्हणजे एका डब्यांत १९ अतिरिक्त सीट तयार होऊन १९ अतिरिक्त प्रवाशांची सोय होणार आहे. याचा फायदा प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना होईल. शिवाय रेल्वेचे तिकिटातून मिळणारे उत्पन्न देखील वाढणार आहे.
कोट -१
रेल्वे बोर्ड ने २५६ डबे तयार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्याचे उत्पादन सुरू झाले. प्रमुख झोनला त्याचे वितरण केले आहे. लवकरच आम्ही आमचे उद्दिष्ट पूर्ण करू.
- जितेश कुमार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल्वे कोच फॅक्टरी, कपुरथला, पंजाब.
कोट २
मध्य रेल्वेला दोन इकोनॉमिक एसी डबे मिळाले आहेत. मात्र त्याचा वापर कधी व कोणत्या रेल्वेस जोडून केला जाईल याबाबत आताच काही सांगता येणार नाही.
- ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई