पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारांस ही मुुुलगी घाबरलेल्या अवस्थेत रडत उभी होती. गर्दी असल्याने तिच्याकडे कुणाचे लक्ष नव्हते. त्याचवेळी स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर व लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील हवालदार महेंद्र गायकवाड हे चहा पिण्यासाठी बस स्थानकाजवळच्या एका हॉटेलमधे निघाले होते. हॉटेलमध्ये प्रवेश करताना कुंजीर यांचे लक्ष अचानक मुलीकडे गेले. ही बाब त्यांनी गायकवाड यांना सांगितली. कुंजीर यांनी तीच्या जवळ जाऊन विचारपुस करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती अधिकच रडु लागली. यानंतर समयसुचकता दाखवून गायकवाड व कुंजीर हे यांनी तिच्याशी गोड बोलून तिला विश्वासात घेतले. ती शांत झाल्यावर तिची विचारपुस केली. यावेळी तिने एका अनोळखी व्यक्तीने तिला कात्रज येथून ऊरुळी कांचन येथे आणल्याचे सांगितले. तिला पळवून आणलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मिळून आला नाही. ऊरूळी कांचन दूूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी हे तेथे पोहोचल्यानंतर उमाकांत कुंजीर यांनी भारती विद्यापीठ पोलीसांशी संपर्क साधला. त्यानंतर मुुलगी देत असलेली माहिती खरी असल्याचे लक्षात आले. यानंतर चौधरी व कुंजीर यांनी तिचे पालकांशी संपर्क साधुन सकाळी १० च्या सुमारांस तिला पालकांच्या स्वाधीन केले. आपली मुलगी सुखरूप असल्याचे पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होतेे.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे दहा वर्षाची अपह्रत मुलगी पालकांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:10 AM