सांगवी : बारामती शहरातील भिगवण रोड, इंदापूर रोड, फलटण रोड, नीरा रोड, पाटस रोडने पोलीस ठाण्याच्या अधिपत्याखालील गावांत गस्त घालावी लागते. यामुळे गेल्या दहा वर्षांपासून बारामती तालुका पोलीस ठाण्याला स्कॉर्पिओ मिळण्यासाठी अनेक वेळा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून तब्बल दहा वर्षांनी तालुका पोलिसांचे हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. शहरातील ५ ते ६ कंपन्यानी एकत्र येत पुढाकार घेतला आणि शरयू फौंडेशनच्या माध्यमातून स्कोर्पिओ वाहन भेट देण्यात आली आहेत.
बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी देण्यात आलेल्या स्कॉर्पिओचे पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करून वाहन पोलीस ठाण्याला हस्तांतरण करण्यात आले. बारामती तालुका गुन्हे शोध पथकाने गेली दोन वर्षांत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणून आरोपीना जेलची हवा खायला लावली होती. सध्या गुन्हे उघडकीस आणणे, कायदा सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी तसेच घरफोडी, दरोडे, चोरीचे प्रकार रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालणे यासाठी बारामतीच्या चारी बाजूने जाण्यासाठी गाडी अत्याआवश्यक होती. यामुळे आता पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करताना तसेच तालुक्यात दिवसा व रात्री गस्त घालण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. तसेच हे वाहन तालुक्यात शांतातूर्ण वातावरण राहण्यासाठी चोवीस तास कार्यरत राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.
गाडीच्या पूजनावेळी बारामतीचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते,बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या सह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.