पुणे : शहरातील बालवाडी शिक्षिका व अंगणवाडी सेविकांना पगारवाढ देण्यासाठी प्रशासनाने घातलेली १५ वर्षांची अट गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दहा वर्षे केली. यामुळे आता जास्तीत जास्त बालवाडी शिक्षिकांना यांचा फायदा होणार आहे. तसेच अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे सहा महिन्यांची प्रसुती रजाही देखील उपसूचना देऊन मान्य करण्यात आली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बालवाडी शिक्षिका व अंगणवाडी सेविकांच्या पगार व रजाबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने यासाठी स्वतंत्र धोरण तयार केले. प्रशासनाने तयार केलेल्या धोरणाला मान्यता देताना स्थायी समितीच्या बैठकीत १५ वषार्पेक्षा अधिक सेवा झालेले आणि १५ वर्षांपेक्षा कमी सेवा झालेले असे दोन स्तर तयार केले होते. सर्वसाधारण सभेत गुरुवारी हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आला होता. त्यावेळी १५ वर्षांची अट १० वर्षे करण्याबरोबरच त्यांना सहा महिन्याची प्रसुती रजा देण्यात यावी, अशा उपसूचना देण्यात आल्या. त्याला एकमताने मंजुरीही देण्यात आली. त्यामुळे १० वर्षांहून कमी सेवा झालेल्या बालवाडी शिक्षिकांना दहा हजार रुपये व सेविकांना साडेसात हजार रुपये मानधन मिळणार आहे. तर १० वर्षांहून अधिक सेवा झालेल्या शिक्षिकांना अकरा हजार पाचशे रुपये व सेविकांना साडेआठ हजार मानधन मिळणार आहे. तसेच प्रत्येक दोन वर्षांनी यामध्ये १० टक्के दरवाढ देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना दहा नैमित्तिक रजा मिळणार आहेत, तसेच १८० दिवस प्रसुती रजा, शहरी गरीब योजनेच्या सभासदत्वासाठी उत्पन्नाची अट शिथिल, गाडीखान्यातून विनामूल्य औषधे, पालिका रुग्णालयात विनामूल्य उपचार व औषधे या सुविधा मिळणार आहेत. मराठी, उर्दू, इंग्रजी व कन्नड माध्यमांच्या ५१५ बालवाडी शिक्षिका आणि ४२३ बालवाडी सेविकांना याचा फायदा होणार आहे.
बालवाडी शिक्षिकांच्या पगारवाढीसाठी पंधरा ऐवजी आता दहा वर्षांची अट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 7:20 PM
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बालवाडी शिक्षिका व अंगणवाडी सेविकांच्या पगार व रजाबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने यासाठी स्वतंत्र धोरण तयार केले.
ठळक मुद्देमहापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय : सहा महिन्यांची प्रसुती रजाही मंजुर१५ वषार्पेक्षा अधिक सेवा झालेले आणि १५ वर्षांपेक्षा कमी सेवा झालेले असे दोन स्तर तयार ५१५ बालवाडी शिक्षिका आणि ४२३ बालवाडी सेविकांना याचा फायदा होणार