पुणे : दिवे घाटामध्ये रात्री ट्रकचालकाची लूट करणाऱ्या दोघांना प्रत्येकी दहा वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.
सलीम ऊर्फ डी. बादशाह बाबू तांबोळी (वय २६, रा. येरवडा) व रोहन नंदकिशोर नागे (वय २४, रा. हडपसर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद करण्यात आले आहे. ही घटना ११ सप्टेंबर २०१६ रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास सासवड परिसरातील पवारवाडी भागात घडली. गणेश भंडलकर (वय २९) यांनी फिर्याद दिली होती. गणेश हे बारामती येथून सासवडमार्गे पुण्याकडे येत होते. या वेळी, आरोपींनी मोटारसायकलवरून येऊन त्यांची दुचाकी ट्रकपुढे आडवी लावली आणि ट्रक उभा केला. दुचाकीवरून उतरून शिवीगाळ आणि कोयत्याने मारहाण करून ड्रायव्हर व क्लीनरकडील मोबाइल व रोख साडेचार हजार रुपये जबरदस्तीने लुटून नेले.
याच प्रकारे त्यांनी त्या दिवशी आणखी एक गुन्हा केल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांना अटक करून त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे ॲड. चंद्रकिरण साळवी यांनी कामकाज पाहिले. त्यांनी बारा साक्षीदार तपासले. साक्षीदरम्यान, आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. साक्षीदारांनी आरोपींना साक्षीदरम्यान न्यायालयातही ओळखले. तांबोळी व नागेकडे मिळवून आलेला मुद्देमाल, तसेच फिर्यादींनी दिलेली साक्ष आरोपींवर दोषारोप सिद्ध करण्यासाठी पुरेशा असल्याचा युक्तिवाद ॲड. साळवी यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली.