तुळशीराम घुसाळकर , लोणी काळभोरगेल्या आठवड्यात उरुळी कांचन येथे झालेल्या अपघातस्थळी मोठी लोकवस्ती असतानाही रस्त्याच्या कडेला जाळ््या नव्हत्या. त्या असत्या तर रानडुक्कर महामार्गावर आलेच नसते व ११ निरपराध्यांचा बळी गेला नसता. दुभाजकाची उंची जास्त असती तर यातील काहींचे प्राण वाचले असते. यामुळे ‘लोकमत’ने कवडीपाट ते यवतदरम्यान केलेल्या पाहणीत गेली दहा वर्षे येथे टोलवसुली सुरू आहे, मात्र रस्ता असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. पुणे - सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते यवत (ता. दौंड) या भागातील रस्त्याचे काम आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) या कंपनीने केले आहे. परंतु प्रवाशांना आवश्यक त्या सोई-सुविधा दिल्या नाहीत. आयआरबी कंपनीला कवडीपाट ते यवत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मिळाले आहे. या सत्तावीस किलोमीटरच्या कामासाठी त्या वेळी ८८ कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सन २००४ पासून या कंपनीने टोलवसुलीचे काम सुरू केले आहे. शासनाने या कंपनीला १९ वर्षे टोलवसुली करण्याची परवानगी दिली आहे. महिलांसाठी एकही शौचालय नाही. पुरुषांसाठी एक शौचालय आहे; परंतु त्याचे पाणी टोलनाक्याशेजारी तेथेच रस्त्याच्या कडेला सोडले आहे. महिला प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होते. कंपनीने जेथे लोकवस्ती आहे; त्यापैकी काही ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी सर्व्हिस रोड तयार केले आहेत. खोलेवस्ती येथून लोणी काळभोर गावात येणाऱ्या पुलाखाली प्रचंड घाण पडलेली असते. कुत्री, डुकरे तेथे कायम असतात. महामार्गावरील वाहतुकीचा धोका पत्करायला नको, म्हणून महिला, शाळेतील मुले, वयोवृद्ध नागरिक या रस्त्याचा वापर करतात. परंतु प्रचंड दुर्गंधी व कुत्रे, डुकरांच्या तावडीतून सुटका करून त्यांना प्रवास करावा लागतो. कंपनी सहा महिने किंवा वर्षातून एकदा या रस्त्याची जेसीबी मशीन लावून स्वच्छता करते. कदमवस्तीसमोर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे एक गेट आहे. या गेटसमोरील सर्व्हिस रोडवर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी कंपनीत जाणारे व येणारे टँकर उभे असतात. तेथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे एक विद्युत रोहित्र आहे. याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असतो. अधूनमधून हा कचरा पेटवला जातो, तो दिवसभर पेटत राहतो. या आगीमुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाळूवाहतूक केली जाते. वाहतूकवेळी ही वाळू महामार्गावर सांडते. या सांडलेल्या वाळूवरून दुचाकी वाहने घसरतात. कधी कधी हात-पाय मोडण्यावर भागते, तर कधी दुचाकीचालकाचा जीवही जातो. सन २००४ मध्ये चारपदरी महामार्ग तयार झाला तेव्हा मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये जनावरे व नागरिक महामार्गावर येऊन अपघात होऊ नयेत, म्हणून लोखंडी जाळी टाकण्यात आली होती. परंतु सध्या बहुतांश ठिकाणची जाळी गायब झालेली आहे. तसेच त्याखालचा फुटपाथही आपोआपच तुटला आहे.
दहा वर्षे टोलवसुली; पण रस्ता असुरक्षित!
By admin | Published: March 16, 2017 2:01 AM