पुणे: भाडेकरार करताना संकेतस्थळात येणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे भाडेकरू तसेच जागामालक अक्षरश: वैतागले होते. त्यामुळे एजंटांसह जागामालक तसेच नागरिकांनी अनेक आंदोलने केली. मात्र, आता ही समस्या यापुढे उद्भवणार नसल्याचा दावा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केला आहे यासाठी २.० ही नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यात आता या प्रक्रियेत सहभागा होणाऱ्या नागरिकांच्या सुचना मागविण्यात आल्या आहेत. त्याचा अंतर्भाव नव्या प्रणालीत करून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात क्यूआर कोडचा वापर करून दस्ताची सत्यता पडताळणी करता येईल त्यातून गैरप्रकार थांबतील अशी विभागाला आशा आहे.
राज्यात दरवर्षी दहा लाखांपेक्षा जास्त ऑनलाइन भाडेकरार नोंद होतात. भाडेकरू नियंत्रण कायदा १९९९ च्या कलम ५५ नुसार ऑनलाइन भाडेकराराच्या दस्ताची नोंदणी अनिवार्य आहे. सध्या भाडेकरार (लिव्ह अॅण्ड लायसन्स) नोंदविण्याची १.९ ही प्रणाली जुनी आहे. त्यामुळे २.० ही प्रणाली विकसित केली आहे. याअंतर्गत भाडेकरार नोंदविल्यानंतर त्याची माहिती क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टीम्स (सीसीटीएनएस) या पोलिसांच्या संगणक प्रणालीत आपोआप मिळणार आहे. तसेच नोंदणी करताना पोलिस ठाण्याची निवड केल्याने दस्त नोंदणी थेट संबंधित पोलिसांकडे जाणार आहे. त्यामुळे पोलिसांची पडताळणी अधिक वेगाने होईल. पूर्वी प्रमाणेच भाडेकराराची प्रत प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात नेऊन देण्याची गरज राहणार नाही.
दस्त नोंदविताना मुद्रांक शुल्क व नोंदणी फीसाठी स्वतंत्र ग्रास प्रणालीचा वापर कारावा लागत होता. त्याचा क्रमांक नोंदणी करताना टाकावा लागत होता. नव्या प्रणालीत तयार करण्यात आलेल्या सुविधेत आवश्यक पैशांची पूर्तता केल्यानंतर ती नोंदणी फी म्हणून स्वीकारला जाणार आहे. नोंदणी झालेल्या दस्ताला एक स्वतंत्र क्यूआर कोड देण्यात येणार आहे. पूर्वीच्या प्रणालीतही क्यूआर कोड होता. मात्र, नव्या कोडमध्ये भाडेकरार करणारे, जागामालक यांच्या माहिती तसेच जागेची सविस्तर माहिती व तारखेचा उल्लेख असेल. हा कोड मोबाईलमधून स्कॅन करून दस्ताची संपूर्ण माहिती मिळेल. त्यातून फसवणूक टाळता येणार आहे.
''ही नवीन प्रणाली https:// igrmaharashtra. gov. in/, https:// igrmaharashtra. gov. in/ यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांचा अभिप्राय २८ ऑक्टोबरपर्यंत feedback. leavenlicense2 @gmail. com या ई-मेलवर पाठविण्याची सुविधा आहे. आलेल्या योग्य अभिप्रायांची दखल नव्या प्रणालीत घेतली जाईल. सध्या ही प्रणाली केवळ अभिप्राय जाणून घेण्याकरिता आहे. त्यामुळे या प्रणालीवर दस्त नोंदणी होणार नाही. ही प्रणाली दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. तूर्त ऑनलाइन भाडेकराराचे दस्त नोंदविण्यासाठी लिव्ह अॅण्ड लायसन्स १.९ हीच प्रणाली सुरू राहणार आहे. - अभिषेक देशमुख, नोंदणी उपमहानिरीक्षक (संगणक), पुणे''