नम्रता फडणीस
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘इतिहासाविषयीचे कमालीचे आकर्षण... कुतूहल... जिज्ञासा आणि संशोधक वृत्तीमुळे तरुण पिढीचा ओढा इतिहासाकडे वाढू लागला आहे. त्यामुळे शहरातील पुस्तक विक्रेत्यांकडे अगदी राजा शिवछत्रपती यांच्यापासून ते स्वामी, मृत्युंजय, राधेय यांसारख्या विविध ऐतिहासिक पुस्तकांविषयीची मागणी वाढू लागली आहे. विशेषत: सोशल मीडियावर इतिहासाविषयी अनेकदा माहितीअभावी उथळ चर्चांना पेव फुटत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, इतिहासाचे अचूक संदर्भ जाणून घेण्याकरिता पुस्तक वाचनाकडे कल वाढतोय, ही चांगली बाब आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील ऐतिहासिक घडामोडींचा जाज्वल्य इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा एक ट्रेंड सुरू झाला आहे. चित्रपटांमुळे खरं तर इतिहासाची पाळंमुळं जाणून घेण्याची नव्याने उत्सुकता तरुणाईमध्ये निर्माण झाली असल्याचे सांगितले जाते. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जाते. मात्र, खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर पुस्तकांशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाल्याने तरुणाईचा कल ऐतिहासिक पुस्तकांकडे वाढला असल्याचे पुस्तक विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
------------------------------------
जुन्या साहित्याला मागणी वाढली आहे. त्याबरोबरच तरुणाईकडून ऐतिहासिक पुस्तकांना विशेष पसंती आहे. राजा शिवछत्रपती, मृत्युंजय या पुस्तकांना ऑनलाइन मागणी आहे. इतिहासाविषयीची कमालीची उत्सुकता हे यामागील प्रमुख कारण असू शकते. अनेक ऐतिहासिक पुस्तकांसाठी तरुणाईकडून विचारणा केली जात आहे.
- रमेश राठिवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी
--------------------------------------
इतिहास हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय आहे. एखादा चित्रपट किंवा मालिका आली की त्या ऐतिहासिक विषयाचे संदर्भ जाणून घेण्यासाठी तरुणांकडून त्या संबंधित पुस्तकाची मागणी वाढते. त्यामुळे ऐतिहासिक पुस्तकांना मागणी ही वाढतच असते, ती कमी झालेली नाही.
- नीलेश भार्गव, पुस्तक विक्रेता
----------------------------
तरुणांना इतिहास या विषयाची आवड खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ती पूर्वीही होती. फक्त त्यावेळी फारशी साधन उपलब्ध नव्हती. सोशल मीडिया नसल्याने चर्चेला फारसा वाव नव्हता. आजच्या काळाला अनुरूप नव्या साधनांमधून तरुण आवड जपू पाहात आहेत. ही चांगली गोष्ट आहे. त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास हा वैभवशाली असून, तो गोडी लावणारा आहे. इतिहासाविषयी चर्चा करणे, संशोधक वृत्ती आणि जिज्ञासा असणे ही सकारात्मक बाब आहे.
- प्रसाद तारे, इतिहास अभ्यासक
--------------------------------