नीलेश राऊत -पुणे : शहरातील रुग्णसेवेसाठी तत्पर असलेल्या पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने, भारतरत्न स्व़ राजीव गांधी रुग्णालय (येरवडा) येथे ‘3.0 टेस्ला एमआरआय’ मशीन खरेदी करण्यासाठी तब्बल ९ कोटी ९० लाख रुपयांची जाहीर निविदा काढली आहे. प्रत्यक्षात या दर्जाच्या मशीनचे बाजारमूल्य हे ६ कोटी ४५ लाख रुपये आहे. तरीही तब्बल साडेतीन कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या दराची निविदा काढून हे मशीन खरेदी करण्याचा घाट आरोग्य विभागाकडून घातला गेला आहे.सदर एमआरआय मशीन बसविल्यावर बंद अवस्थेत ठेवता येत नसून, त्याकरिता महिन्याला लाखो रुपयांची वीज खर्ची करावी लागणार आहे. त्यातच हे मशीन खरेदी केल्यावर बंद ठेवल्यास यामधील ‘हेलियम गॅस’ उडून जातो व हे मशीन काही उपयोगास येत नाही़ असे असतानाही, या मशीनकरिता आवश्यक असलेले स्वत:चे मनुष्यबळ व ऑपरेटिंगकरिता खासगी संस्था उपलब्ध नसतानाही, कोट्यवधी रुपयांची मशीन घेऊन आरोग्य विभागाला काय साध्य करायचे आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, येरवडा येथील रुग्णालयात एमआरआय मशीन बसविण्यासाठी नियोजन सुरू झाल्यावर, १३ नाव्हेंबर, २०१९ रोजी सिमेन्स कंपनीने पालिकेला ९ कोटी ९० लाख रुपयांचे मशीनबाबत खर्च तपशील सादर केला. त्यानुसार १० फे ब्रुवारी, २०२० रोजी वर्तमानपत्रातून निविदा जाहिरात देऊन, ५ मार्च, २०२० पर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र हे ‘3.0 टेस्ला एमआरआय’ मशीन एकाच कंपनीला समोर ठेवून व त्यांचीच गुणवैशिष्ट्ये नमूद केल्याने निविदेबाबत अन्य कंपन्या या मशीनसाठी पुढे आल्या नाहीत. याबाबत आयोजित प्री-बीड मीटिंगमध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीने या मशीनची क्षमता व त्याची बाजारातील मूळ किंमत यावर हरकत घेऊन आक्षेपही नोंदविला आहे. विशेष म्हणजे हेच मशीन सिमेन्स कंपनीने काही महिन्यांपूर्वीच बारामती येथील एका संस्थेला ६ कोटी ४५ लाख रुपयांना विकले आहे.दोन वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसह ६ कोटी ८५ लाख एवढी या मशीनची किंमत असताना, या दर्जाच्या एमआरआय मशीनकरिता तब्बल ९ कोटी ९० लाख रुपयांची निविदा काढण्यात आल्याने, आरोग्य विभागाच्या कोट्यवधींच्या उधळपट्टीचा प्रकार उजेडात आला आहे.
मशीन खरेदी प्रकाराची चौकशी व्हावी : टिंगरेस्व़ राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये खरेदी करण्यात येत असलेले हे एमआरआय मशीन अतिशय बेसिक मशीन असून, त्याचा लाभ रुग्णांना झाला पाहिजे त्या प्रमाणात मिळणार नाही. मुळातच ही बेसिक मशीन बाजारात सहा ते साडेसहा कोटींना उपलब्ध असताना दहा कोटीला खरेदी केली जात आहे. त्यामुळे यातील भ्रष्टाचार टाळण्यासाठी सदर एमआरआय मशीन खरेदी प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे़, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी ‘लोकमत’कडे केली.........निविदा प्रक्रियेत शुद्धिपत्रक काढणार स्व़ राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये खरेदी करण्यात येत असलेल्या एमआरआय मशीन खरेदी निविदा प्रक्रिया चालू आहे. दरम्यान, या मशीनबाबत ससूनच्या क्ष-किरण तज्ज्ञांचे मत जाणून शुद्धिपत्रक काढण्यात येणार आहे - डॉ़ रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका. ...........वाढीव दराची निविदापालिकेच्या पद्मावती येथील शिवशंकर पोटे हॉस्पिटलमध्ये तीन वर्षांपूर्वीच आरोग्य विभागाने अत्याधुनिक असे एमआरआय मशीन ११ कोटी २५ लाख रुपयांना सर्व पायाभूत सुविधांच्या खर्चासह खरेदी केले होते. हे मशीन खरेदी करताना सर्व खबरदारी घेणाऱ्या याच आरोग्य विभागाने मात्र आता, ‘3.0 टेस्ला एमआरआय’ मशीन घेण्याकरिता साडेतीन कोटी रुपयांच्या वाढीव दराच्या जाहीर निविदांसाठी जाहिरात दिली आहे. याची मुदत ५ मार्च, २०२० पर्यंत आहे.