पिंपरी : मंडईत महापालिकेने अधिकृत वाटप केलेल्या गाळ्यांमधील भाजीविक्रेते आणि मंडईबाहेर रस्त्यावर थांबून भाजी विक्री करणाऱ्यांमध्ये वाद झाला. सकाळी ११ला हाणामारी, शिवीगाळीचा प्रकार घडला. दोन गटांतील यावादात स्थानिक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होऊ लागल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दोन गटांवर परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली. पिंपरी मंडईतील भाजी विक्रेत्यांमध्ये वारंवार वाद उद्भवतो. महापालिकेने भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून दिलेल्या गाळ्यांमध्ये भाजी विक्री करणाऱ्यांकडून मंडईबाहेर भाजी विक्री करणाऱ्यांना विरोध केला जातो. मंडईबाहेर बसणाऱ्या पथारीवाल्यांना विरोध केला जात असल्याने बुधवारी त्या ठिकाणी शिवीगाळ, हाणामारीचा प्रकार घडला. गाळ्यामधील विक्रेता संतोष वडमारे याला काहींनी मारहाण केली. त्याला मारहाण करणारे लोक स्थानिक नगरसेवक अरुण टाक यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप लाल बहादूर शास्त्री मंडईतील गाळेधारक असलेल्या काही सदस्यांनी केला. महापालिकेला रीतसर भाडे भरून त्या गाळ्यांमध्ये भाजी विक्री करणाऱ्यांची बाजू मंडई संघटनेचे अध्यक्ष विष्णू साळवे यांनी घेतली. बेकायदा भाजी विक्री करणाऱ्यांमुळे गाळ्याचे भाडे भरून भाजी विक्री करणाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. तर वर्षानुवर्षे मंडईबाहेर रस्त्यावर भाजी विक्री व्यवसाय करणाऱ्यांनाही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, त्यांनी कोठे जायचे, असा मुद्दा उपस्थित झाल्याने वाद चिघळत गेला आहे. पिंपरी पोलिसांकडे सोनू विनोद पिल्ले (वय ३६) यांनी विष्णू साळवे, संतोष वडमारे, भारत जगताप या तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. तर संतोष वडमारे यांनी सचिन सौदाई, सन्नी सौदाई यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत. शिवीगाळ, हाणामारी आणि धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणात केवळ स्थानिक नगरसेवकच नाही, तर अन्य पदाधिकाऱ्यांचाही हस्तक्षेप होत असल्याने मंडईतील विक्रेत्यांच्या वादाला राजकीय स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे काम महापालिका प्रशासनालाच करावे लागणार आहे. मंडईत अतिक्रमण करून भाजीविक्री करणाऱ्यांबद्दल काय निर्णय घ्यायचा हा महापालिका प्रशासनाचा अधिकार आहे. परंतु हा प्रश्न महापालिका प्रशासनाकडे मांडण्याऐवजी स्थानिक पुढारी आपापल्या परीने त्यात हस्तक्षेप करू लागले आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. या घटनेमुळे मंडई परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. धमकीप्रकरणी एकास अटक चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील एका उद्योजकास पाच लाखांची खंडणी मागून, ती न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीस खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. अमोल ऊर्फ सोन्या राजू भालेराव (वय १९, रा. इंदिरानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील एका उद्योजकास गेल्या आठवड्यात ४ व ५ मार्चला अनोळखी व्यक्तीने फोन करून पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली. पाच लाख रुपये न दिल्यास जिवे मारण्याचीही धमकी दिली. त्यानुसार गुन्ह्याचा तपास करीत असताना खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना अमोल भालेराव हा उद्योजकाला पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी फोन करीत असल्याचे समजले. त्यानुसार भालेराव याला अटक केली. त्याने एक वर्षापूर्वी आपण संबंधित उद्योजकाकडे नोकरीला होतो. मात्र, पुरेसा पगार न मिळाल्याने नोकरी सोडून दिली. एकाची आत्महत्या निगडी : वाल्हेकरवाडीत एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. ९) दुपारी घडली असून, दत्तात्रय निंबाजी थोरात (वय ४८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव) असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय थोरात हे वाल्हेकरवाडी येथील मनपा शाळेसमोर राहत असून, ते एका ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.(वार्ताहर)> पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकाच्या खुनाचा प्रयत्न फसलानिगडी : दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका युवकाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचा खुनाचा कट पोलिसांनी उधळून लावला. ही घटना सोमवारी सायंकाळी प्राधिकरण येथे घडली असून,या प्रकरणी पोलिसांनी खुनाच्या तयारीतील दहा जणांना अटक केली आहे. आरोपींनी अपहरण केलेल्या अशरफ असिफ शेख (वय २०, रा. प्राधिकरण, निगडी) या युवकाची पोलिसांनी सुटका केली आहे. अनिरुद्ध ऊर्फ विकी राजू जाधव (वय १९, रा. जाधववाडी, रावेत), रोहन रामभाऊ जगदाळे (१९, रा.दत्तनगर, निगडी), आदित्य धर्मपाल आनंद (१८, रा.कुंदन आर्केड,प्राधिकरण), अक्षय कैलास चोपडे (१९, रा. चिंचोली, देहूरोड) आदित्य विजय पवार (१८, रा. प्राधिकरण), कय्यूम इम्तियाज सय्यद (२०, रा. प्राधिकरण), स्वप्नील काळे (२२, रा. प्राधिकरण), शार्दूल जाधव (१८, रा.निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्या बरोबर असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशरफने अपहरकर्त्यांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्राधिकरण येथील रस्त्यावरून जात असताना, दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून दहा जणांनी अशरफ याचे चाकूचा धाक दाखवून अपहरण केले. त्यास जबरदस्तीने दुचाकीवर बसवून विकी जाधवच्या रावेत येथील खोलीवर नेले. सहायक पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांना याबाबत कोणीतरी फोनवरून माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे गेले असता, अशरफ शेख या तरुणाचे अपहरण झाले असल्याचे त्यांना समजले. त्यांनी अशरफचा मोबाइल क्रमांक मिळवला. मोबाइल क्रमांक मिळवून तांत्रिक बाबीच्या आधारे पोलीस आपल्या मागावर असल्याचे आरोपींच्या लक्षात आले. त्यांनी खोलीतून बाहेर काढून अशरफला रावेत परिसरात सोडून दिले. नंतर तेथून ते गायब झाले. दरम्यान, पोलिसांना अपहरकर्त्यांपैकी काहींची नावे समजली. (वार्ताहर)> सोनसाखळी हिसकावलीनेहरुनगर : मासूळकर कॉलनी येथील रसरंग चौक येथे रस्त्यावरून पायी चाललेल्या एका महिलेच्या गळ्यातील ४८ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली. याप्रकरणी कमला कृष्णमूर्ती (वय ७८, रा अमित सोसायटी, मासूळकर कॉलनी, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला कृष्णमूर्ती या रविवारी रात्री आठच्या सुमारास मासूळकर कॉलनी येथील साई मंदिरासमोरून आपल्या घरी जात असताना केएनएस पिझ्झा सेंटर येथे विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी कमला कृष्णमूर्ती यांच्या गळ्यातील ४८ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून चोरटे पळून गेले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.भोसरीत घरफोडीभोसरी : भोसरीत दिवसाढवळ्या घरफोडी करून तीन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली.फिर्यादी ६०वर्षीय महिला या भोसरीतील दिघी रोड येथील गीताई अपार्टमेंटमध्ये राहतात. मंगळवारी दुपारी सव्वाअकरा ते बाराच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या वेळी चोरट्याने दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटला. दोन लाखाची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.मूक दाम्पत्याची आत्महत्याचिंचवड : मूक दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली असून, ही घटना चिंचवड येथील रामनगर येथे घडली. प्रदीप कुसाळकर (वय २३) व पूजा कुसाळकर (वय १९,रा. दोघेही, रामनगर, चिंचवड) असे या आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे दाम्पत्याचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. बुधवारी हे दोघे दाम्पत्य घरी एकटेच होते. तर त्याचे दोन भाऊ व आई कामाला गेले होते. त्या वेळी या दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आई संध्याकाळी पाचच्या सुमारास कामावरून घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. प्रदीप हा एका खासगी कंपनीत कामाला होता. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे चिंचवड पोलिसांनी सांगितले.
राजकीय हस्तक्षेपामुळे पिंपरीत तणाव
By admin | Published: March 10, 2016 12:40 AM