उरुळी कांचन : थेऊर येथे दोन गटांतील हाणामारीत २ जण जखमी झाले असून, गावात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही गटांनी एकामेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केल्या. पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले. काल (दि. १६) रात्रीच्या सुमारास गावचे सरपंच नवनाथ काकडे यांचा गट व गावातील कांबळे गटात बाचाबाची, शिवीगाळ होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र बाबू कांबळे (वय ३१, रा. थेऊर भीमनगर) यांनी दिलेल्या फर्यादीनुसार, थेऊरचे सरपंच नवनाथ तुकाराम काकडे, महादेव दामोदर काकडे, रामभाऊ तुकाराम कुंजीर, कैलास महादेव काकडे, संदीप रामभाऊ कुंजीर, विनोद तुकाराम काकडे व इतरांविरुद्ध फिर्यादीला रिव्हाल्व्हर दाखविणे, शिवीगाळ करणे, लोखंडी गज व हॉकी स्टिकने मारणे इत्यादी आरोपावरून काकडे गटाच्या लोकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष किसन काकडे (वय ३६), किरण रामभाऊ काकडे (वय १९, दोघे रा. काकडे वस्ती थेऊर), तसेच सतीश बाळासाहेब गावडे (वय २१, रा. थेऊर बसस्टॉप), दत्तात्रय कुंडलिक काकडे (वय २५), संजय महादेव काकडे (वय २९, रा. थेऊर गणपती मंदिरामागे) यांना अटक करण्यात आली आहे. काकडे गटाचा सचिन कुंडलिक बोडके (वय २३, रा. थेऊर, बोडकेवस्ती) याच्या फिर्यादीनुसार मारुती पोपट कांबळे, राजेंद्र बाबूराव कांबळे, नितीन देवराम कांबळे, आनंद शिवाजी वैराट, सिद्धार्थ उमाकांत कांबळे, पराग प्रशांत कांबळे, दादा विकास कांबळे, दिनेश हरीभाऊ जाधव, कुमार बाळासाहेब नितनवरे, भाऊ कांबळे, बाळा वाघमारे, राज कांबळे, युवराज डांगरे (सर्व रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गावाच्या हद्दीत बँक आॅफ महाराष्ट्रचे असणारे एटीएम फोडत असताना फिर्यादीने हटकले असता त्यांतील मारुती पोपट कांबळे याने हातातील गजाने, काठीने जबर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच शिवीगाळ करून दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली, या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला.सुनील ऊर्फ बाळा गौतम वाघमारे (वय २६, रा. थेऊर) व कुमार गेनबा नितनवरे (वय २६, रा. थेऊर) या दोघांना अटक केली आहे. (वार्ताहर)
थेऊरमध्ये तणाव
By admin | Published: November 18, 2014 3:21 AM