पिंपरी : पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून संतोष जगदीश भागवत (वय ३२) या तरुणाला वारंवार बोलावून आळंदी पोलिसांकडून मारहाण केली जात होती. त्या त्रासाला कंटाळून विषप्राशन केलेल्या संतोषचा उपचारादरम्यान शनिवारी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांबद्दलचा रोष व्यक्त करून संतोषच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे दुपारी काही काळ वायसीएम रुग्णालयाजवळ तणाव निर्माण झाला होता. दोषींवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. आळंदी पोलीस ठाण्याच्या वैजनाथ महादेव हातमोडे (वय २५) या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा खून झाल्यानंतर संशयित आरोपी म्हणून आळंदी पोलीस ठाण्यात संतोषला वारंवार बोलावले जात होते. त्याला मारहाण केली जात होती. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मित्र बाळासाहेब ढवळे याच्याबरोबर जात असताना संतोषने विषारी औषध प्राशन केले. तशाच अवस्थेत तो आळंदी पोलीस ठाण्यात पोलिसांकडे गेला. तेथे त्याला उलट्या झाल्या. पोलिसांनी त्याला आळंदीतील रुग्णालयात नेले. तेथे सुविधा नसल्याने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात आणले. आठवडाभराने उपचार सुरू असताना वायसीएममध्ये रविवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. संतोषचे नातेवाईक रुग्णालयात आले. जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. संतोषला दिवसभर मारहाण केल्यानंतर सायंकाळी सोडून देतात, असे संतोषने घरी वडील आणि भावाला सांगितले होते. वडील जगदीश व भाऊ कृष्णा यांनी आळंदी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. संतोष दोषी असेल, तर कारवाई करा. पण, उगाच मारहाण करू नका, अशी विनंती त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली होती, असे संतोषच्या नातेवाइकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वायसीएम रुग्णालय परिसरात तणाव
By admin | Published: August 07, 2016 4:03 AM