लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपण मालमत्ता मुलांच्या नावावर केली, तर ते आपल्याला घरातून बाहेर काढतील अशी ज्येष्ठ नागरिकांना भीती वाटत आहे. वडिलोपार्जित मालमत्तेत आपल्याला ही वाटा मिळाला पाहिजे, या विवाहित मुलीच्या वाढत्या अपेक्षाने कुटुंबामध्ये तणाव निर्माण होत आहे. त्यातून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुणे पोलीस दलाच्या वतीने स्थापन केलेल्या भरोसा सेलमधील ज्येष्ठ नागरिक कक्षात आलेल्या तक्रारीवरून हे वास्तव समोर आले आहे.
आपल्या मुला-मुलींसाठी आयुष्यभर खस्ता खाऊन जीवनाच्या अखेरीस ज्येष्ठ नागरिक काही मालमत्ता बाळगून असतात. ही मालमत्ताच आता त्यांच्या कुटुंबात ताण-तणावाला कारणीभूत ठरत आहे. नव्या कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्तेत विवाहित मुलीलाही समान हक्क आहे. परंतु, अजूनही मुलीला हक्क देण्याची मानसिकता मुलांमध्ये दिसून येत नाही. तिच्या लग्नात इतका खर्च केला आता तिला मालमत्तेत का हक्क द्यायचा, अशी भूमिका मुले घेतात. मुलीला अनेकदा तिच्या सासरकडून हा हक्क मागून घेण्याचा दबाव असतो. ज्येष्ठ नागरिकांना त्यातून मार्ग काढणे अवघड होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे आलेल्या तक्रारीत हे कारण प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यापाठोपाठ आर्थिक कारणावरून त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचे आढळून येत आहे.
........
ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे आलेल्या तक्रारी अर्ज ३६२
अर्जावर समुपदेशन करून तोडगा ३३०
प्रगतिपथावर असलेले अर्ज ३२
ज्येष्ठ नागरिक कक्षाला आलेले वर्षभरातील कॉल २६९३
ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी १०९० ही हेल्पलाईन आहे.
.....
मालमत्ता नावावर करून देण्यासाठी मुलगा, सून, मुलगी यांच्यावर ज्येष्ठ नागरिकांवर वाढता दबाव येत असून त्याचा त्यांना अधिक त्रास होत आहे. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना आर्थिक गंडा घालण्याचे प्रकारही अनेक घडले आहेत. आपण मालमत्ता आपल्या वारसाच्या नावावर करून दिली तर तो आपल्याला घराबाहेर काढेल, अशी भीती ज्येष्ठ नागरिकांना विशेषत: जे एकटे राहिले आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना वाटत असल्याचे तक्रार अर्जावरून दिसून येत आहे.
- स्वाती केदार, सहायक पोलीस निरीक्षक, ज्येष्ठ नागरिक कक्ष.